Sambhaji Patil Nilangekar Sarkarnama
मराठवाडा

Bjp Latur Politics : महायुतीच्या मेळाव्यातून आमदार संभाजी पाटील निलंगेकर गायब

Sambhaji Patil Nilangekar Absent At Mahayuti Melava Latur : महायुतीच्या मेळाव्यातून भाजपमधील कलह उघड?

जगदीश पानसरे :सरकारनामा

Latur Mahayuti Melava News :

महाराष्ट्रात मिशन 45 चे ध्येय गाठण्यासाठी भाजप आणि त्यांच्या महायुतीतले शिवसेना-राष्ट्रवादी व छोटे घटक पक्ष कामाला लागले आहेत. महायुतीच्या जिल्ह्याजिल्ह्यातील संयुक्त मेळाव्यांनी या मिशनला सुरूवात झाली आहे. असे असले तरी महायुतीतील गटबाजी आणि मतभेदही या निमित्ताने चव्हाट्यावर येत आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या लातूर येथील महायुतीच्या मेळाव्यातून माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे गायब होते. ते कुठे होते? मेळाव्याचे त्यांना निमंत्रण नव्हते का? होते तर मग ते का आले नाहीत? त्यांची नाराजी कोणाबद्दल आहे? असे अनेक प्रश्न या निमित्ताने केले जात आहेत. Latur जिल्ह्यातील भाजपच्या राजकारणात संभाजी पाटील निलंगेकर हे एक महत्त्वाचे नेते समजले जातात.

गेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांना विजयी करण्याच्या प्रवासात निलंगेकर यांची भूमिका महत्त्वाची होती. मोदी यांना 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने राज्यात अनेक तडजोडी करत शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार यांना सोबत घेत ट्रिपल इंजिनचे सरकार स्थापन केले. या जोरावरच राज्यात 48 पैकी 45 लोकसभेच्या जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपने हाती घेतले आहे.

परंतु भाजपमध्येच अतंर्गत धुसफूस सुरू आहे की काय? अशी चर्चा महायुतीच्या मेळाव्याला संभाजी पाटील निलंगेकर यांनी दांडी मारल्यामुळे होऊ लागली आहे. त्यांचे बंधू भाजप प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर हे मात्र संकल्प मेळाव्याला हजर होते. पण व्यासपीठावर हजर असलेल्या नेत्यांनी त्यांच्याही नावाचा उल्लेख टाळल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

मंत्री संजय बनसोडे यांनी मात्र युवकांचे कुशल संघटक असे म्हणत अरविंद पाटील निलंगेकर यांचा नामोल्लेख केला. यावरून संभाजी पाटील निलंगेकर आणि जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये काही तरी बिनसलंय एवढे मात्र निश्चित.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लातूर येथे महायुतीच्या कार्यकर्ता संकल्प मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले होते. त्यानंतर मेळाव्याचे समन्वयक आमदार रमेश कराड यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजपचे खासदार, आमदार व घटक पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते. इथेही संभाजी पाटील निलंगेकर दिसले नाही. निलंगेकर हे नाराज आहेत का? अशी चर्चा मेळाव्यात आणि जिल्हाभरात आता सुरू झाली आहे.

लातूर लोकसभेची जागा निवडून आणण्यात गेल्यावेळी निलंगेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी- काँग्रेसकडे असलेली जिल्हापरिषद, महानगरपालिका व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेत निलंगेकर यांनी जिल्ह्यात भाजपला झिरो टू हिरो करण्यात मोलाचा वाटा उचलला होता. असे असताना आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संभाजी पाटील निलंगेकर यांची नाराजी पक्षाला परवडणारी नाही.

दरम्यान, संभाजी पाटील निलंगेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. संभाजी पाटील निलंगेकर हे नियोजित विदेश दौऱ्यावर गेल्यामुळे येऊ शकले नसल्याचे संकल्प मेळाव्याचे समन्वयक आमदार रमेश कराड यांनी `सरकारनामा` प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

महायुतीच्या मेळाव्याची तारीख ठरण्याआधीच संभाजी पाटील यांचा विदेश दौरा आणि त्याचे तिकीट बुकींग झाले होते. त्यामुळे ते या मेळाव्याला येणार नाही, याची कल्पना त्यांनी आम्हाला दिली होती आणि आम्हीही आमच्या कार्यकर्त्यांना, महायुतीच्या स्थानिक नेत्यांना दिली होती, असे आमदार रमेश कराड यांनी स्पष्ट केले.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT