Marathwada Political News : लातूरमध्ये झालेल्या पहिल्याच महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांच्या उत्साह दांडगा होता. संजय बनसोडेंनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्यानंतर भाजपचे आमदार अभिमन्यू पवारांनी ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष शिल्लक, असा उल्लेख करत टोला लगावला. महायुतीने यावेळी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
आता शिल्लक शिवसेना, राष्ट्रवादीच्या लोकांनाही महायुतीत घ्या. ज्यांना भाजप नको असेल, त्यांना शिवसेना, अजित पवार गटात घ्या, आपल्याकडे आता अनेक पर्याय आहेत, असे म्हणत महाविकास आघाडीतील नेत्यांना महायुतीचे दार उघडे असल्याचे अभिमन्यू पवारांनी स्पष्ट केले.
संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांना परभणीला जायचे होते, परंतु महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उर्जा भरण्यासाठी स्थानिकचा नेता हवा म्हणून त्यांनी या मेळाव्याला वेळ दिल्याचे सांगत महाविकास आघाडीवर तोफ डागली. महायुतीच्या मेळाव्यानिमित्त पहिल्यादांच तीनही पक्षाचे जिल्ह्यातील नेते, लोकप्रतिनिधी एकाच व्यासपीठावर आले होते. यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला.
आमदार अभिमन्यू पवार यांनीही जोरदार भाषण ठोकत टाळ्या मिळवल्या. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना कोणाची? याचा फैसला मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने दिल्यानंतर अभिमन्यू पवारांनी ठाकरेंची सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शिल्लक राहिलेला पक्ष असा उल्लेख करत जोरदार टोलेबाजी केली. इतकी वर्षे आपण अभद्र युतीमध्ये होतो, त्यामुळे झालेले पक्षाचे आणि राज्याचे नुकसान याचे अनुभव गावागावत जाऊन कथन करा, असे आवाहनही त्यांनी केले.
अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) म्हणाले, अजितदादाचे आम्हाला पूर्वीपासूनच आकर्षण आहे, आता ते आपल्यासोबतच आहेत. आजचा मेळावा म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणारा आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमीवर असलेला पाचशे वर्षापूर्वीचा कलंक मिटला आहे. प्रभू श्रीराम यांचे आपल्या जन्मस्थानी येत्या २२ जानेवारीला आगमन होत आहे. या निमित्ताने देशात मोठा उत्सव होणार आहे, यात प्रत्येक देशवासियाने सहभागी झाले पाहिजे, असे आवाहनही पवारांनी केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिल्लक सेना व शिल्लक राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपल्याकडे घ्या, आपल्याकडे तीन पर्याय आहेत. राहिलेले छोटे-मोठे पक्षही महायुतीत आले पाहिजेत, ज्यांना भाजपा नकोय, त्यांना राष्ट्रवादीमध्ये घ्या, राष्ट्रवादी नकोय त्यांना शिवसेनेत घ्या. एक नव्हे तर आमच्याकडे आता तीन पर्याय आहेत, असेही अभिमन्यू पवार म्हणाले.
राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार आले, एक वेगळी दिशा देण्यासाठी हे सरकार आहे. येणारी निवडणूक काही जिल्हा परिषद, अथवा विधानसभेची नाही तर देशाला दिशा देणारी आहे. कार्यकर्त्यांनी गाफिल राहू नये, व्यासपीठ गच्च भरले, कार्यकर्ते भरपूर जमले परंतु निवडणुकीत काम करावे लागणार आहे. सगळ्यांनी एकदिलाने काम करण्याची गरज असून शेवटपर्यंत आम्ही महायुतीचा धर्म पाळू, अशी ग्वाही आमदार बाबासाहेब पाटील यांनीही यावेळी बोलतांना दिली.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.