Mahayuti-Mahavikas Aghadi : विधान परिषदेच्या सतरापैकी सहा जागा बिनविरोध काढत महायुतीने आधीच महाविकास आघाडीवर कुरघोडी केली. आज उर्वरित अकरा जागांसाठी मतदान पार पडले. मराठवाड्यातील लातूर-बीड-धाराशीव, नांदेड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या चारही स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये महायुतीच शत-प्रतिशत निवडून येणार हे स्पष्ट झाले आहे. उद्या प्रत्यक्षात निकाल लागल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होणार असले तरी महायुतीने ही निवडणूक गांभीर्याने घेतली तर महाविकास आघाडीने आधीच नांग्या टाकल्याचे चित्र सर्वत्र दिसले.
मराठवाड्यातील चार पैकी तीन जागा भाजपाने आपल्याकडे राखत केवळ एक परभणी-हिंगोलीची जागा मित्र पक्ष शिवसेनेला सोडली. छत्रपती संभाजीनगर-जालना हा शिवसेनेकडे असलेला मतदारसंघ भाजपाने संख्याबळाची आकडेवारी समोर ठेवत आपल्याकडे घेतला.
महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर प्रत्येक पक्षाने आपापल्या नगरसेवक, झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्यांना व्हिप बजावत महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले होते. त्याचे आजच्या मतदानात तंतोतंत पालन झाल्याचे बोलले जाते. महायुतीने विजयासाठीचे पुरेसे संख्याबळ असतानाही निवडणूक गांभीर्याने घेतली.
विशेषतः भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी चारही जिल्ह्यात संवाद बैठका घेत मतदारांना विश्वासात घेतले. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी अमर राजूकर यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती. लातूर-बीड-धाराशीवमध्ये बसवराज पाटील यांनी स्वतः तीनही जिल्ह्यात जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधला.
भाजपसह महायुतीतील मित्रपक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठीवरही त्यांनी भर दिला होता. धनंजय मुंडे, तानाजी सांवत यांच्यासारख्या मजबुत नेत्यांना मदतीची गळ घातली आणि एकही मत हलणार नाही याची काळजी बसवराज पाटील यांनी घेतली.
परभणी-हिंगोलीची जागा शिवसेनेच्या वाट्यावर आल्यानंतर सुरुवातीला भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराजीचा फटका महायुतीच्या सईद खान यांना बसतो की काय? असे चित्र निर्माण झाले होते. परंतु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतून सुत्रे हलवत मित्रपक्ष भाजपा आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे वरिष्ठांकडून कान टोचले आणि आमदार राजेश विटेकर, भाजपातील काही नाराज नेते महायुतीचा धर्म पाळण्यास तयार झाले.
इकडे छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजप महायुतीने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली होती. भाजपाकडे बहुमत असल्याने मित्रपक्षांच्या साथीने इथे सुहास शिरसाट हे गेल्यावेळी अंबादास दानवे यांच्या नावावर असलेल्या सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. .
महापालिका, जिल्हा परिषदेत शिवसेनेला मिळालेली दुय्यम वागणूक, हक्काची विधान परिषदेची जागा भाजपाने खेचल्याची नाराजी स्थानिक नेत्यांमध्ये होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी युती धर्माचे पालन करण्याचे आदेश दिल्यानंतर ही नाराजी त्यांना गुंडाळून ठेवावी लागली.
विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हाच मराठवाड्यात भाजप-महायुतीचे पारडे जड असल्याचे त्यांच्याकडे असलेल्या संख्याबळावरून स्पष्ट झाले होते. नांदेडमध्ये महाविकास आघाडीने महायुतीच्या अमर राजूकर यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला.
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ऐनवेळी सूत्र हलवत काँग्रेसच्या रामदास सुमठाणकर यांना माघार घ्यायला लावली. विशेष म्हणजे काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वानेही हा निर्णय मान्य केला. मात्र, ऐन मतदानाच्या चोवीस तास आधी नागेश पाटील आष्टीकर फुटल्याचे समोर आले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या आशा धुळीस मिळाल्या.
परभणीत महायुतीचे सईद खान विरुद्ध महाविकास आघाडीचे डाॅ. नांवदर, अपक्ष देशमुख यांच्यात तिरंगी लढत अपेक्षित होती. इथेही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय जाधव फुटले आणि त्याचा परिणाम नावंदर यांच्या उमेदवारीवर झाल्याचे चित्र आहे. अपक्ष देशमुख यांचाही गेम यामुळे फसला. महायुतीचे सईद खान यांनी लावलेली तगडी फिल्डिंग पाहता इथेही त्यांचीच सरशी होण्याची दाट शक्यता आहे.
जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महाविकास आघाडीच्या देवयानी डोणगावकर यांनी ऐनवेळी माघार घेतली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचेच महापालिकेतील गटनेते गणेश लोखंडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ येऊन पडली. शिवाय एमआयएमने आपला स्वतंत्र उमेदवार दिला. त्यामुळे संख्याबळाचा विचार करता महायुती इथेही बाजी मारणार हे स्पष्ट आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.