Municipal Corporation Election News : राज्यातील 29 महानगर पालिकांसाठीचे मतदान काही तासांवर आलेले असताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी अमूक एका पक्षाला मुंबईत पाठिंबा जाहीर केल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर स्वतः जरांगे पाटील यांनी खुलासा करणारा व्हिडिओ सोशल मिडियावर जाहीर केला आहे. महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीसाठी आपला महायुती किंवा महाविकास आघाडी असा कोणत्याच पक्षाला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले.
माझ्या काही जुन्या व्हिडिओ क्लीप व्हायरल करून माझा या पक्षाला पाठिंबा असे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही ठिकाणी अशी पत्रकही काढली गेल्याची माहिती आपल्या कानावर आली होती. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गैरसमज निर्माण होऊ नये, यासाठी आपण हे स्पष्ट करत आहोत.
मुंबईच काय महाराष्ट्रातील कुठल्याच जिल्ह्यात, कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय आपण घेतलेला नाही. स्थानिक पातळीवर समाज बांधवांनी काही निर्णय घेतला असेल तर तो घेण्याचा त्यांना अधिकार आहे. तो मी हिरावून घेऊ शकत नाही, पण माझ्याकडून कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही, याचा पुनरुच्चार मनोज जरांगे पाटील यांनी केला.
महापालिका निवडणुकीसाठी उद्या सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान होणार आहे. राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर आणि परभणी या पाच महापालिकांसाठी उद्या मतदान होणार आहे. याशिवाय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजप युती आणि उद्धव-राज ठाकरे या दोन भावांच्या आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळत आहे.
मुंबई महापालिकेच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे. ठाकरे ब्रँडची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली आहे. तर भाजपला मुंबई महापालिकेत शतप्रतिशत सत्ता हवी आहे. मुंबईतील या हायव्होल्टेज निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची नेमकी भूमिका काय? याबद्दल तर्क लढवले जात होते. दरम्यान, आरक्षण आंदोलनादरम्यान, मुंबईत ठाकरेच पाहिजे या त्यांच्या विधानाचा आताच्या महापालिका निवडणुकीशी संबंध जोडत त्यांचा मुंबईत उद्धव आणि राज ठाकरे यांना पाठिंबा असल्याच्या पोस्ट आणि चर्चा सोशल मिडियावर सुरू झाल्या होत्या.
उद्या प्रत्यक्ष मतदान असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी या सगळ्या गोष्टींचा खुलासा करणारा व्हिडिओ जारी केला. उद्याच्या महापालिका मतदानात राज्यात कुठेही मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही आणि विरोधही केला नाही. माझ्या जुन्या व्हिडिओला एडिट करून त्याचा वापर जर कोणी केला असेल तर ते चुकीचे आहे.
कुठलेही पाठिंब्याचे पत्र किंवा तसा निर्णय आपण घेतलेला नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गैरसमज पसरवू नये. जे कोणी मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत, त्यांना धडा शिकवला पाहिजे. पण महायुती किंवा महाविकास आघाडी अशा कोणालाही आपला पाठिंबा नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.