Maratha Reservation Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : जरांगेंच्या पाठीशी आता ओबीसी क्रांती परिषद; मराठ्यांना विरोध करण्यामागे ओबीसी नेत्यांचा स्वार्थ...

Mangesh Mahale

Beed : एकीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळू नये, अशी मागणी होत असताना दुसरीकडे बीडमध्ये मात्र ओबीसी क्रांती परिषदेने मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे. ओबीसी क्रांती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यापूर्वी 70 टक्के मराठा समाज ओबीसीमध्ये आलेला आहे. त्यामुळे इतर सर्वसामान्य आणि गरीब मराठा समाजाला ओबीसीमध्ये सहभागी करून घेण्यात आम्हाला कुठलीही अडचण नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलला अल्टिमेटम उद्या (ता.२४) संपत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं, यासाठी ओबीसी क्रांती परिषदेच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. ओबीसी क्रांती परिषदेच्या या मागणीमुळे मराठा आरक्षणावरून ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मराठा समाजाला ओबीसीमध्ये सहभागी करून घेऊ नये, असे राजकीय नेते म्हणत असले तरी ते त्यांच्या स्वार्थासाठी बोलत आहेत. त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाज हे कायम एकमेकांसोबत राहिले आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळावा," अशी आमची भावना असल्याने आम्ही बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत आहोत," असे किरण चव्हाण यांनी सांगितले.

आरक्षणासाठी तरुणांकडून टोकाचा निर्णय

दरम्यान, आरक्षणासाठी युवकांचे आत्महत्या करण्याचे सत्र थांबलेले दिसत नाही. पाच दिवसांत आत्महत्या करणाऱ्या मराठा युवकांची संख्या आता पाच झाली आहे. काल (रविवारी) दहावीत शिकणारा ओमकार आनंदराव बावणे याने गावाजवळ असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालु्क्यातील भोपाला या गावात हा प्रकार घडला. काल रविवारी (ता. 22) नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वडगाव येथे राहणाऱ्या शुभमने मराठा आरक्षणासाठी टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच कालच्याच दिवशी आणखी एका मराठा समाजाच्या तरुणाने आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT