उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आंदोलनाचे नेते, मनोज जरांगे-पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. "मी महायुतीच्या नेत्यांकडून मराठा आरक्षणाबाबत लिहून आणतो. तुम्ही फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून आणा," असं आव्हान आमदार राऊत यांनी जरांगे-पाटील यांना दिलं होतं.
आमदार राऊत यांनी जरांगे-पाटील यांना थेट लक्ष्य केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यानंतर बार्शीतील मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आंतरवाली-सराटी येथे जरांगे-पाटील यांनी भेट घेतली. तेव्हा, बोलताना जरांगे-पाटील ( Manoj jarange Patil ) यांनी आमदार राऊत यांचं आव्हान स्वीकारलं आहे. "मी तुझे चॅलेंज स्वीकारलं आहे," असा एकेरी जरांगे-पाटील यांनी आमदार राऊत यांना ठणकावून सांगितलं आहे.
जरांगे-पाटील म्हणाले, "राजेंद्र राऊत ( Rajendra Raut ) दादा तुम्ही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्याकडून लिहून आणायचं की 'ओबीसीतून आरक्षण देण्यास तयार आहेत.' मला तो कागद दाखवायचा. तो कागद मी मराठ्यांकडे देतो. मी तुझे चॅलेंज स्वीकारलं आहे. तू जे-जे महाविकास आघाडीतील नेत्यांची नावे घेतो, त्यांच्याकडून मराठे लिहून आणतील. अन्यथा राज्यात पाडून टाकतील."
"तुमची भूमिका स्पष्ट कर... चल... महाविकास आघाडीनं भूमिका स्पष्ट नाही केली, तर मराठे त्यांना महाराष्ट्रात फिरून देणार नाही, निवडूनही येऊन देणार नाहीत. मी कशामुळे लिहून आणू. सत्तेत तुम्ही आहात. आधी तुमची भूमिका स्पष्ट करा. मी शब्द दिला, तर मागे हटत नाही," असं जरांगे-पाटलांनी सांगितलं.
राजेंद्र राऊत काय म्हणाले होते?
"देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याकडून मराठा आरक्षण देण्याबाबत लिहून आणण्याची जबाबदारी माझी आहे. ते कसे लिहून देत नाहीत, ते मी बघतो. या तीनही नेत्यांनी मराठा आरक्षणाबद्दल लिहून दिलं नाही, तर मी राजकीय संन्यास घेतो. तुम्ही फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून आणा. तुम्ही दिलेला शब्द पाळा," असं आव्हान आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे-पाटील यांना दिलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.