Manoj Jarange Patil  sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : आमदार राऊतांच्या 'त्या' गंभीर आरोपाला मनोज जरांगेंचं उत्तर, म्हणाले, 'बार्शीत येऊन...'

Datta Deshmukh

Manoj Jarange Patil News: बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी 'मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते. हे विधान तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांनो मनोज जरांगेंनी केलं आहे.' असा गंभीर आरोप केला होता. यावरून मनोज पाटील यांनी राजेंद्र राऊतांना फटकारले आहे.

'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातुन मराठ्यांमध्ये फुट पाडण्याची खेळी करत आहेत. राजेंद्र राऊत यांनी पोपटपंची करू नये', असा टोला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील लगावला. ही खेळी महाराष्ट्रातील मराठे यशस्वी होऊ देणार नाहीत', असा इशाराही पाटील यांनी दिला.

मराठा समाजास आरक्षण दिले तर आम्ही राजकारण करणार नाही. पण जर आरक्षण दिले नाही तर आम्हाला विचार करावा लागेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

मनोज जरांगे पाटील यांच्या घोंगडी बैठक सुरू आहेत. माजलगाव मतदार संघातील घोंगडी बैठक तेलगाव येथे झाली.भर पावसात झालेल्या या बैठकीस सभेचे रूप आले होते.

मनोज जरांगे पाटील म्हणाले,मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण मिळावे. यासाठी गेल्या वर्षभरापासुन आपण लढत असून सरकार आरक्षण देण्यास टाळाटाळ करत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज एकत्रित आला असून यातुन मराठ्यांनी आपली एकजुट दाखवून दिली आहे. आपल्याला जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आपली एकजुट अशीच कायम ठेवा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

मला राजकारणाची अथवा निवडणुकीची लालसा नाही. मला फक्त माझ्या गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे असून मराठ्याच्या लेकरांना आरक्षण द्यायचे आहे. त्यासाठीच माझा लढा असल्याचे जरांगे यांनी म्हटले.

बार्शीत सभा घेणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठा समाजात फुट पाडण्याची खेळी खेळत आहेत. मात्र मराठा समाज त्यांची ही खेळी ओळखून आहे. राऊत यांनी ही आपली पोपटपंची जास्त करू नये, असा इशारा देत राऊतांचा समाचार घेण्यासाठी आपण लवकरच बार्शीत सभा घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT