Manoj Jarange Patil remains firm on the Maratha reservation protest after meeting Shiv Sena MLA Abdul Sattar. Sarkarnama
मराठवाडा

Maratha reservation : जरांगेंच्या मनधरणीसाठी शिंदेंच्या आमदाराकडून शिष्टाई, दोघांमध्ये तासभर चर्चा; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत नेमकं काय ठरलं?

Manoj Jarange Abdul Sattar Meeting : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. 29 ऑगस्टपासून होणाऱ्या या आंदोलनात मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Jagdish Patil

Jalna News, 23 Aug : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून आंदोलनाची घोषणा केल्यानंतर सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असताना शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी त्यांची भेट घेतली. तब्बल तासभर झालेल्या या भेटीत सत्तार यांनी जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरांगे यांनी उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केल्याने सत्तारांची शिष्टाई निष्फळ ठरल्याचे चित्र आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. 29 ऑगस्टपासून होणाऱ्या या आंदोलनात मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून जरांगे यांच्याशी चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी जरांगे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहेत. गेल्या अडीच वर्षांत सरकारने मराठा समाजासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे नियोजित उपोषण स्थगित करावे, अशी विनंती सत्तार यांनी केली.

'सरकार मराठा समाजाचे नुकसान करतंय'

मात्र, जरांगे यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत आपल्या मागण्यांचा पाढाच सत्तारांसमोर वाचला. सरकारकडून मराठा समाजाचे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. दिलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द होत आहेत, व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होत नाही, महामंडळाचा परतावा मिळत नाही, मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ मिळालेला नाही, तसेच सरकारने काढलेले अध्यादेश रद्द केले जात असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

"आम्हाला वेड्यात काढू नका. ओबीसींचे मुंबईत आंदोलन आहे, तर आम्ही अंतरवाली सराटीत उपोषण करणार आहोत. सरकारने काही डाव टाकण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मुख्यमंत्र्यांचा बंगला पाहण्यासाठी मुंबईला जाऊ," असा इशाराही जरांगे यांनी दिला.

'मुंबईला वेठीस धरू नका'; सत्तारांचा जरांगेंना सल्ला

दरम्यान, मुंबईत आंदोलन केल्यास शहर वेठीस धरले जाऊ शकते, त्यामुळे मुंबईत आंदोलन करू नका, असे आवाहन सत्तार यांनी केले. "माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मुंबईला आंदोलन करून वेठीस धरू नका. सरकारकडून तुम्हाला न्याय मिळेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या मागण्यांबाबत योग्य निर्णय घेतील," असे सत्तार यांनी म्हटले.

मात्र, सत्तार यांच्यासोबत तासभर चर्चा होऊनही जरांगे आपल्या भूमिकेवरून मागे हटलेले नाहीत. त्यामुळे 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत होणाऱ्या आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकार आणि जरांगे यांच्यातील हा तणाव आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT