Maratha Reservation : सरकारने मराठा समाजाचे प्रश्न सोडण्यासाठी प्रत्येक आंदोलनात वेळ मागून घेतला. पण त्या काळात मागण्या मान्य करण्याऐवजी मला एकटं पाडण्यासाठी, उघडं पाडण्यासाठी षडयंत्र रचले जात आहेत. आताही मी तीन महिन्यांचा वेळ दिला तो मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, पण सरकारकडून पुन्हा तेच केले जात आहे.
मी आता तीन महिने काहीच बोलणार नाही. माझ्याविरोधात कितीही षडयंत्र रचले, माझ्या जवळच्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरी मी मागे हटणार नाही, असं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. अंतरवाली सराटीतून एखादी भगिनी माझ्यावर टीका करत असेल तर करू द्या, त्यावर मी काहीही बोलणार नाही, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
अंतरवाली सराटीने मराठा समाजाला खूप काही दिले आहे. त्यामुळे कोणी गैरसमजातून टीका केली असेल तर त्याला कोणीही उत्तर देऊ नये, असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. व्यासपीठ काढले म्हणून टीका केली जात असेल आणि अंतरवालीतील काही लोकांना जर वाटत असेल मी तिथून पुन्हा आंदोलन करावं तर त्यांनी व्यासपीठ उभारावे, मी तयार आहे, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारला दिलेला तीन महिन्याचा वेळ त्यांनी कारणी लावावा. मराठा समाजाचे मन जिंकण्याचा सरकारने प्रयत्न केला पाहिजे. पण ते उलट माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. कोणाच्या कुठे, कोणासोबत बैठका झाल्या? याची माहिती, पुरावे फोटो माझ्याकडे आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचण्यासाठी अशा बैठका घेणे योग्य नाही.
वेळ आल्यानंतर हे सगळं बाहेर काढेन, अजून कोण किती खालच्या पातळीवर जातो, याकडे माझे लक्ष आहे. मी मराठा समाजासाठी लढू नये, आरक्षण मागू नये, असे जर सरकारला वाटत असेल तर मी थांबणार नाही. माझ्या जवळच्या लोकांना, सहकाऱ्यांना कितीही त्रास झाला तरी, समाजासाठीचा लढा सुरूच ठेवणार, अशी ठाम भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.
माझे समाजबांधवांना आवाहन आहे की तुम्ही सतर्क रहा, रात्र वैऱ्याची आहे. आम्ही झालं गेलं विसरण्याचा प्रयत्न करतो, पण हे सरकार काड्या करतं, तीन महिन्याचा वेळ दिला आहे, या काळात मागण्या मान्य झाल्या नाही, तर आंदोलन संपलेलं नाही, पाटोद्यात आम्ही ते स्थगित केलं होतं. त्यामुळे तीन महिन्याची वेळ संपल्यानंतर पाटोद्यातूनच आम्ही पुढे निघू, मागे फिरणार नाही, असा इशाराच जरांगे पाटील यांनी यावेळी सरकारला दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.