Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal Sarkarnama
मराठवाडा

Chhagan Bhujbal : बीडच्या सभेआधीच भुजबळांकडून जरांगे लक्ष्य; 'पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या सभा असल्या तरी...'

Anand Surwase

Beed News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या सभांना लाखोंच्या संख्येने गर्दी होत आहे. त्यातच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे म्हणून जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. दरम्यान, जरांगे-पाटील यांच्या बीडमधील सभेसाठी शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली गेली. त्याला मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेत जरांगे-पाटील यांच्या सभांवेळी ही विशेष व्यवस्था कशासाठी? असा सवाल उपस्थित केला आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास मंत्री छगन भुजबळ यांचा विरोध आहे. त्यामुळे जरांगे-पाटील आणि भुजबळ यांच्यात सातत्याने वादाच्या ठिणग्या पडताना दिसून येत आहेत.

त्यातच आज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या बीडमधील इशारा सभेच्या कारणास्तव प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र कोणत्याही सभा, मेळावे यांबद्दल कोणाला आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण त्यासाठी थेट शाळा बंद ठेवणे किंवा सुट्टी जाहीर करणे नक्कीच चुकीचे आहे, असे मत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी त्यांच्या एक्स हॅण्ड़लवरून व्यक्त केले आहे.

ही विशेष व्यवस्था कशासाठी?

बीड शहरातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. त्यावरून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या राज्यात नेमके काय सुरु आहे? देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या सभा असल्या तरीही अशाप्रकारे शाळा बंद ठेवल्या जात नाहीत, मग जरांगे-पाटील यांच्या सभांवेळी ही विशेष व्यवस्था कशासाठी? असा सवाल उपस्थित केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

झुंडशाही, हुकूमशाहीला विरोध

मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) किंवा त्यासाठी सुरू असलेल्या सभांना माझाच काय, कोणाचाही विरोध नाही. परंतु ही झुंडशाही, हुकूमशाही सुरू आहे, त्याला मात्र नक्कीच विरोध आहे. मराठा समाजातील सुज्ञ बंधू-भगिनींना देखील हे अजिबात पटणार नसल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. तसेच अशा प्रकारच्या कृतीमधून आपण काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात? असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे? एका समाजातील काही ठराविक लोकांच्या दबावाला, झुंडशाहीला आपला कायदा, प्रशासन बळी पडतंय का? असा सवाल करत भुजबळ यांनी असले प्रकार हे लोकशाहीला धरून नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

तसेच बीडच्या सभेसाठी शिक्षण विभागाने जी सुट्टी जाहीर केली आहे त्याची राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.

भुजबळ म्हणाले, यापूर्वी देखील जालना जिल्ह्यात मनोज जरांगे यांच्या होणाऱ्या सभेमुळे जालना जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे पत्रक काढले होते. मी त्यावेळी जिल्हा परिषदेच्या या निर्णया विरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर रात्री उशिरा ते सुट्टीचे परिपत्रक मागे घेण्यात आले होते. जरांगे-पाटील यांच्या सभावेळी अशाप्रकारे सुट्टी दिली जाण्याच्या प्रकाराविरोधात मी जाहीर सभा, माध्यमे आणि विधानभवनातही आवाज उठवला असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT