Chhatrapati Sambhajinagar, 29 Sep : "मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडाल तर तुमचा राजकीय एन्काऊंटर होईल",असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना दिला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या गृहमंत्री अमित शाह यांनी, आम्ही अनेक आंदोलनं हाताळली आहेत. त्याप्रमाणे मराठा आंदोलनही व्यवस्थित हाताळू, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरून जरांगे पाटील यांनी उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गुर्जर आणि पटेल समाजाचं आंदोलन हाताळलं त्या पद्धतीने आमचं आंदोलन हाताळू नका. महाराष्ट्रात तुमची पद्धत चालणार नाही असं म्हणत शाह यांना इशारा दिला. जरांगे म्हणाले, "तुम्ही जर मराठ्यांना बाजूला ठेवलं आणि तुम्हाला जे काही आणायचं आहे ते आणलं तरी तुम्ही संविधानाच्या पदावर बसू शकत नाहीत. तुम्ही मराठा आरक्षणाबाबत दुसरी पद्धत वापरू नका.
गुर्जर आणि पटेल समाजाचं आंदोलन तुम्ही हाताळलं तसं मराठ्यांचंही आंदोलन हाताळू असं तुम्हाला वाटत असेल, तर त्या पद्धतीने आमचं आंदोलन हाताळू नका. महाराष्ट्रात तुमची पद्धत चालणार नाही. मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत तु्म्ही पडाल तर तुमचा राजकीय एन्काउंटर होईल, तसंच कळस बसवण्याआधी मूर्ती बसवणारे हे आंदोलन हाताळणार का? असा प्रश्न विचारत त्यांनी शाहांवर टीका केली.
तर यावेळी त्यांनी फडणवीसांचं नाव घेत मराठ्यांना आरक्षण द्यावचं लागणार असल्याचं वक्तव्य केलं. ते म्हणाले, "देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांना (Amit Shah) सांगतो की, "मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावंच लागणार आहे. निवडणुकीच्या आधी अध्यादेश काढावा लागणार आहे. तुम्ही मराठ्यांना सोडून राज्यात सत्ता स्थापन करू शकत नाहीत. मी चांगल्या भावनेने सांगतो, तुम्ही आंदोलन चांगल्या भूमिकेने हाताळलं तर तुम्हाला ते परवडेल.
जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीही हटवू शकत नाही. हे मी देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांना सांगत आहे. तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत मला चांगली माहिती आहे. जर तुम्हाला वाटत असेल मराठ्यांना बाजूला ठेवून हे आंदोलन हाताळू तर अमित शाहांची ही घोडचूक असेल", असंही ते यावेळी म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.