Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : उद्याच्या बैठकीपुर्वीच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली

Manoj Jarange Patil Health Deteriorated: औषधोपचार आणि विश्रांतीचा सल्ला देऊन डाॅक्टरांचे पथक परतले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे समर्थक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या, अंतरवालीत महत्वाची बैठक होणार आहे.

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटी यांनी राज्यभरातून अंतरवालीत उमेदवारीसाठी आलेल्या इच्छुकांपैकी काही जणांना अर्ज दाखल करायला सांगितले. अंतिम उमेदवार अर्ज कोणाचा ठेवायचा, कोणी माघार घ्यायची? या संदर्भात उद्या (ता.31) रोजी अंतरवाली सराटी येथे महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यातून काही मुस्लिम धर्मगुरू, दलित नेते या बैठकीसाठी अंतरवालीत येणार आहेत. तत्पुर्वीच आज मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली. अंगात ताप आणि थकवा जाणवत असल्याची तक्रार केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयाचे एक पथक अंतरवालीत दाखल झाले.

मनोज जरांगे पाील यांच्या नियमित तपासण्या केल्यानंतर सातत्याने दौरे, बैठका, भेटीगाठींमुळे जरांगे पाटील यांना अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागल्याने त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

औषधोपचार आणि विश्रांतीचा सल्ला देऊन डाॅक्टरांचे पथक परतले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे समर्थक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या, अंतरवालीत महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेले असताना मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आज बिघडली.

परंतु उद्याची बैठक पुर्वी ठरल्याप्रमाणेच होणार असून मुस्लिम धर्मगुरू, दलित समाजाचे नेते बैठकीला येणार असल्याने इतर कोणीही उद्या अंतरवाली सराटीत येऊ नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्यावतीने करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत कुठे उमेदवार द्यायचे, कुठे पाठिंबा द्यायचा, कोणत्या मतदारसंघात उमेदवार द्यायचे नाही,या संदर्भातील भूमिका जरांगे पाटील यांनी याआधीच स्पष्ट केली आहे.

शिवाय विधानसभा निवडणुकीत जिंकायचे असेल, ताकद दाखवायची असेल तर मराठा-मुस्लिम-दलित समीकरण जुळवावे लागेल, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी आणि जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून अंतरवाली सराटीत सत्ताधारी, विरोधक अशा सगळ्याच पक्षाच्या उमेदवार, इच्छुकांची गर्दी झाली होती. जरांगे पाटील यांनी कोणालाच कुठलाही शब्द अद्याप दिलेला नाही.

उद्या (ता.31) रोजी अंतरवालीत मनोज जरांगे पाटील आणि विविध समाजाचे धर्मगुरू यांच्यात होणाऱ्या बैठकीत महत्वाचा निर्णय होणार आहे. या निर्णयाचे राजकीय पडसाद विधानसभा निवडणुकीत आणि राज्यभरात उमटणा आहे. ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दीड वर्षापासून लढा सुरू केला आहे.

महायुती सरकारने जरांगे पाटील यांची मागणी मान्य न करत स्वतंत्र दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला लागू केले. मात्र यावर समाधानी नसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाची आपली मागणी लावून धरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT