Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा उपोषणाला बसणार, सरकार मराठा आरक्षण देणार का ?

Jagdish Pansare

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथून वर्षभरापुर्वी आंदोलनाला सुरवात करणारे मनोज जरांगे पाटील आज मध्यरात्रीपासून सहाव्यांदा उपोषणाला बसणार आहेत. आधीच्या पाच उपोषणातून काय साध्य झाले? समाजाच्या पदरात काय पडले ? असे विचारणाऱ्यांना जरांगे पाटील यांनी वेळोवेळी उत्तरे दिली आहेत. पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण, सगेसोयरेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केले असा आरोप केला जातो, त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठवाडा आणि महाराष्ट्रात भोगावा लागला. मनोज जरांगे पाटील यांनी यापुर्वी पाच वेळा उपोषण केले, सरकारने आश्वासने, शब्द, अद्यादेश, परिपत्रके काढून वेळ मारून नेली, असा आरोप केला जातो. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला वेळ देत उपोषणाला बसण्याचे जाहीर केले आहे.

त्यानूसार आज मध्यरात्रीपासून मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. मला राजकारण करायचे नाही, माझ्या समाजाला राजकारण करायचे नाही. हक्काचे आरक्षण द्या, तुम्हीच दिलेले शब्द, आश्वासन पुर्ण करा, असे आवाहन या निमित्ताने मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत केलेल्या पाच उपोषणातून सरकारला अनेक धक्के बसले.

लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर वगळता सातही मतदारसंघात महायुतीचा सफाया झाला. महाराष्ट्रात भाजप-महायुतीचे मिशन-45 कोलमडले. (Manoj Jarange Patil) विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती टळावी, यासाठी सरकारकडून काही प्रयत्न इथून पुढे तरी केले जातात ? यावर मनोज जरांगे पाटील यांचा व मराठा समाजाचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय रोल असेल? हे स्पष्ट होणार आहे. मध्यरात्रीपासून जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होणार असल्याने पुन्हा एकदा मराठवाडा आणि राज्यातील राजकीय वातावरण तापणार आहे.

आंदोलनाचा प्रवास..

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पहिले उपोषण 29 आॅगस्ट 2023 रोजी अंतरवाली सराटी येथे सुरू केले होते. सतरा दिवस चाललेल्या या उपोषणाला पोलिसांकडून झालेला लाठीमार, गोळीबाराने गालबोट लागले होते. मात्र त्यानंतर मराठा आरक्षणाचे वादळ राज्यभरात पोहचले. सतरा दिवसानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांचे हे उपोषण आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देत सोडवले होते.

सरकारने नोंदींच्या आधारे मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र वाटप करत काही पावलं पुढे टाकली. पण त्यानंतर मात्र प्रक्रिया थंडावली, सरकारने दिलेली आश्वासने, शब्द फिरवला आणि 25 आॅक्टोबर 2023 ला मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले. पहिल्या सतरा दिवसाच्या उपोषणानंतर दुसरे उपोषण 9 दिवस चालले. पुन्हा सरकारच्या शिष्टमंडळाने आम्ही काय करत आहोत, हे लेखी देत जरांगे पाटील यांना उपोषण मागे घ्यायला लावले.

पण वारंवार मुदत वाढवून मागत सरकारच्या शिष्टमंडळाने कायदेशीर अडचणी सांगितल्या. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला वेळ सरकारने काही पेच सोडवण्यासाठी कारणी लावला. पण वरवरची मलमपट्टी करून काही भागणार नव्हते. मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्यांदा उपोषण सुरू केले ते 10 फेब्रुवारी 2024 मध्ये, हे उपोषणही सतरा दिवस चालले. पण आधीचे उपोषण संपवले तेच यावेळी घडले. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला वेळ दिला.

उपोषण मागे घेताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात संवाद दौरे करत आरक्षणाची धग कुठेही कमी होणार नाही, याची काळजी घेतली. सरकारला वेळ देण्याची कारणे पटवून दिली. परिणामी जरांगे पाटील यांच्यावर विरोधकांकडून कितीही हल्ले झाले तरी समाजाचा त्यांच्यावर असलेला विश्वास अढळ राहिला. चार जून रोजी जरांगे पाटील यांनी चौथे उपोषण सुरू केले, ते दहा दिवस चालले. पुन्हा सरकारला वेळ देत जरांगे यांनी मराठा समाजात जनजागृतीचे काम सुरू ठेवले.

आधीच्या चार उपोषणाच्यावेळी दिलेल्या आश्वासनांची गाडी काही पुढे सरकली नाही. उलट मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात ओबीसी, भाजपच्या नेत्यांना अंगावर सोडल्याचा आरोप झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जरांगे याच्या निशाण्यावर राहिले. फडणवीस हेच मराठा समाजाला आरक्षण मिळू देत नाही, त्यांनी ठरवले तर आरक्षण मिळू शकते, असं जरांगे पाटील यांनी जाहीर बोलून दाखवले. मराठा आरक्षणासारख्या सामाजिक विषयाला राजकीय वळण देत तो चिघळवत ठेवण्याचाच सरकारचा प्रयत्न अधिक राहिला, हा मनोज जरांगे पाटील यांचा आरोप कायम आहे.

सरकारला दिलेली वेळ संपली की पुन्हा उपोषण हे धोरण जरांगे पाटील यांनी कायम ठेवले. 20 जुलै 2024 रोजी जरांगे पाटील यांनी पाचवे उपोषण सुरू केले. चार दिवस चाललेले उपोषण सरकारच्या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी मागे घेतले. वर्षभरात पाच उपोषण करूनही मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कायम आहे.

उद्या, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सहावे उपोषण सुरु करण्यासाठी जरांगे पाटील यांनी हाच मुहूर्त निवडला. आज मध्यरात्री पासून अंतरवाली सराटीत जरांगे पटील यांचे सहावे उपोषण सुरू होत आहे. हे उपोषण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारे ठरते का ? याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT