Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : दलित-मुस्लिम-मराठा समीकरण जुळले आता बंजारा, ओबीसी यांच्याशीही चर्चा करणार - मनोज जरांगे

Manoj Jarange On Vidhansabha Election : आम्ही सर्व जागा लोकशाही मार्गानं लढणार आहोत. कोणाचीही दादागिरी आणि गुंडगिरी चालू देणार नाही, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.

Jagdish Pansare

Maharashtra Vidhan sabha Election: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मुस्लीम, बौद्ध धर्मगुरू आणि दलित नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक आज अंतरवाली सराटी येथे पार पडली. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.

मुस्लीम, दलित, मराठा समीकरणावर एकमत झालं असून, मराठ, दलित आणि मुस्लीम एकत्र आल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर बंजारा समाज आणि ओबीसी समाजासोबतही चर्चा करणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी विविध समाजाच्या धर्मगुरू आणि नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक बोलावली होती.

या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या बैठकीत जरांगे पाटील काय निर्णय घेतात याकडे महायुती, महाविकास आघाडी तसेच तिसऱ्या आघाडीचेही डोळे लागले होते. केवळ मराठा मतांवर विजय मिळवता येणार नाही, त्यासाठी दलित -मुस्लिम आणि इतर छोट्या घटकांना सोबत घ्यावे लागेल, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत चर्चा झाली आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी समीकरण जुळल्याचे माध्यमांना सांगितले.

'अन्यायाचं संकट आम्हाला परतवून लावायचं आहे, आता गुलामगिरीत जगायचं नाही म्हणजे नाही.  बंजारा समजा आणि ओबीसी समाजासोबतही चर्चा करणार आहे.  कोणत्या जागा लढवायच्या आणि किती जागा लढवायच्या याबाबत येत्या तीन तारखेला निर्णय घेणार आहे. आम्ही सर्व जागा लोकशाही मार्गानं लढणार  आहोत. कोणाचीही दादागिरी आणि गुंडगिरी चालू देणार नाही.' असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

जरांगे पाटील यांनी आजही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. 'आमच्या देवेंद्र तात्यांनी मला लक्ष केलं. राजकारणाच्या वाटेवर नेऊ नका सांगत होतो,  त्यांनी नेलं. आता माझा कोणी विरोधक नाही. मी लोकशाही मार्गाने जात आहे. आम्हाला तुमच्या वाटेनं जायचं नाही. पण आडवा आला तर सोडणार नाही.

तुमचा एक कागद आला तरी माणूस मोकळा जाऊ देणार नाही. कुणाचीही जात पाहात नाही.  मला एखादा कागद आला तर एका फोनवर मी त्यांचं काम करतो. दलित, मुस्लीम असो की धनगर असो प्रत्येकाचे काम करतो. मी जात कधीच पाहत नाही.', असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

'देश कठीण परिस्थितीतून जात आहे. अनेक आव्हाने आहेत. देशातील लोक विभाजीत झाले तर विदेशी ताकदीचा मुकाबला करता येणार नाही. देशात फूट पाडणाऱ्या ताकदी सत्तेत आहेत. त्या विदेशी शक्तीच्या एजंट आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर देशाला विभाजित केलं जात आहे. फोडा आणि राज्य कराचा जुनाच फॉर्म्युला वापरला जात आहे.

महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचं राज्य आहे. आर्थिक राजधानी इथेच आहे. पण राज्यातील भांडवल गुजरातला नेलं जात आहे. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा सवाल आहे. राज्याचा इतिहास प्रेम आणि सद्भावनेचा आहे. शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचे इनचार्ज इब्राहीम खान होते', असं सज्जाद नोमानी म्हणाले.

भाजप(BJP) आणि संघाने धर्माच्या नावावर वाद निर्माण केले. सर्व धर्माच्या विरोधात जाऊन त्यांनी देशवासियांमध्ये फाळणी केली. गेल्या 40वर्षापासून मी संपूर्ण देशात गरीब, मुस्लिम, एससी एसटी, महिला, शेतकरी या सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे”, असंही ते म्हणाले.

‘अदानी आणि अंबानींना सर्व दिलं जातं’ -

“सर्वाधिक आत्महत्या करणारे शेतकरी महाराष्ट्रात आहे. अदानी आणि अंबानींना सर्व दिलं जात आहे. शेतकरी उपाशी मरत आहे. देशातील खऱ्या समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी कधी मंदिर, कधी मशीद तर कधी ख्रिश्चनांचा विषय काढला जात आहे. आज एक दलित व्यक्ती घोड्यावर बसून त्याची वरात काढू शकत नाही ही देशाची परिस्थिती आहे.

बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सर्वधर्म समभाव आणि समतेचा विचार मांडला. संविधानात बंधुत्व दिलं आहे. मी कायद्याचा विद्यार्थी होतो. मी अमेरिका आणि इतर देशाचे संविधान वाचले आहे. सर्व देशात मी फिरलो आहे. पण भारतासारखं संविधान मी कुठे पाहिलं नाही”, असं सज्जाद नोमानी म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT