Manoj Jarange investigation demand : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा इशारा दिला आहे. या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. फडणवीस आणि शिंदेंनी छक्के-पंजे बंद करावेत. माझ्याविरोधात ज्या टोळ्या लावल्या आहेत, त्या तत्काळ बंद करा. आमच्या भावना अजून चांगल्या आहेत, असे म्हणत जरांगे यांनी सूचक इशारा दिला.
‘देशात यांचे असलेले नेटवर्क फाडून सर्व समोर आणले आहे. यंत्रणा कमजोर करून पडद्यामागील सत्य समोर आणले आहे. हे प्रकरण सोपे समजू नका,’ असेही जरांगे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कथित ऑडिओ क्लिपवरून सुरू असलेल्या राजकीय वादाला पुन्हा धार आली आहे.
कथित ऑडिओ क्लिपचा स्रोत उघड करण्यास नकार देताना जरांगे म्हणाले, ‘तारीख आहे, ऑडिओ क्लिप समोर आहे. मी स्रोताचे नाव सांगू शकत नाही. त्याच्या जीवाला धोका होईल. सर्व समोर आहे. त्यामुळे तपास व्हावा.’ ही क्लिप विधान परिषदेतील आमदारांमार्फत पोहोचवण्यात आल्याचा आरोप होत असल्याबाबत विचारले असता, संबंधितांकडून सत्य स्वीकारले जाणार नाही, अशी टीका त्यांनी केली. ‘ते असेच म्हणणार. सत्य स्वीकारणार नाहीत. यातून जनता त्यांच्यावर चवताळेल आणि त्यांच्यापासून दूर जाईल,’ असे जरांगे (Manoj Jarange) म्हणाले.
500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेमध्ये संघर्ष वाढत असल्याच्या चर्चेवरही जरांगे यांनी भाष्य केले. या प्रकरणात एकनाथ शिंदे यांनी पैसे घेतले नसल्याचे जाहीरपणे सांगितल्यास, त्यांच्या मुलाच्या प्रतिष्ठेवरही प्रश्न उपस्थित होऊ शकतात, असे ते म्हणाले. ‘माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. त्याच्या प्रतिष्ठेवर परिणाम होणार आहे. पैसे घेतल्याचे बोलले जात आहे. हे प्रकरण निस्तरावेच लागेल. हा केवळ आरोप-प्रत्यारोपांचा विषय नाही. भाजपने पैसे दिले असतील, तर त्यांनाही ते मान्य करावे लागेल. या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास व्हायला हवा,’ असे जरांगे यांनी सांगितले.
मित्रपक्ष म्हणून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला, तरी ते शक्य होणार नाही, असा दावाही त्यांनी केला. ‘आम्हाला कच्चे समजताय का? एवढ्या लांबवर हात टाकतोय, ते समजून घ्या. देशातील यांचे नेटवर्क तोडू शकतो. नेटवर्क कमजोर केले आहे. पडदा फाडून त्यामागचे समोर आणले आहे,’ असे म्हणत त्यांनी पुन्हा इशारा दिला.
आपल्याला संरक्षणाची गरज नसल्याचे सांगत जरांगे म्हणाले, ‘जाऊ तिकडे संरक्षण, मला काही गरज नाही. बघू किती दिवस षड्यंत्र रचतात.’ दरम्यान, रामदास कदम यांना एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देऊ नये, असा निरोप दिल्याच्या चर्चेवरही जरांगे यांनी भाष्य केले. ‘ते काही बरळत आहेत. मी राणेसाहेबांविरोधात कधी बोललो नाही; पण पोराला सोडले नाही. रामदासभाई भगव्यासाठी लढले आहेत. आता हा माणूस काही बरळायला लागला आहे,’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.