Manoj Jarange sarkarnama
मराठवाडा

Manoj jarange News : 'मराठ्यांच्या मतावर निवडून येता, मग तुम्हाला मस्ती येते'; जरांगे पाटील खासदार काळेंवर भडकले...

Jagdish Pansare

Jalna News : लोकसभा निवडणुकी मराठवाड्यातील आठ पैकी सात मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा महाविकास आघाडीला झाला. लोकसभेच्या जालना मतदारसंघात काँग्रेस-आघाडीचे डाॅ. कल्याण काळे प्रचंड मतांनी विजयी झाले. आज सकाळीच त्यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

यावेळी दोघांमध्ये बरीच चर्चा झाली. पण या चर्चेत मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेसचे (Congress) विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. गोरगरिब मराठ्यांची मते घ्यायची, निवडून यायचे आणि काम संपले की, मराठा समाजाच्या विरोधात बोलायचे, अशी दुटप्पी भूमिका चालणार नाही. तुमची हीच भूमिका राहिली तर, येणाऱ्या विधानसभेत सगळं उलटसुलट होईल, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी कल्याण काळे यांना दिला.

निवडणुकीत आमच्या भोळ्याभाबड्या मराठा समाजाचा फायदा घ्यायचा, त्यांची मतं घेऊन निवडून यायचं आणि आणि निवडून आला की तुम्हाला मस्ती येते. मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही, अशी तुमची भाषा सुरू होते. ही भाषा कोणाची आहे, आता तुम्ही निवडून आलात, पण विधानसभेला सगळ्यांना पाडू एवढी ताकद गोरगरीब मराठ्यांमध्ये आहे, असा गर्भित इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे पाटील यांची आक्रमक भूमिका पाहता खासदार काळे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना फोन लावून जरांगे पाटील यांच्याशी संपर्क करून देण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही, असे बोलले जाते. एकूणच लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची मत घेईपर्यंत न बोलणारे अनेक राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जातीयवादाचे आरोप केले होते. त्याला 13 मे रोजीचे मतदान पार पडल्यावर आम्ही जातीयवादी झालो का? असा सवाल जरांगे पाटील यांनी केला होता. जरांगे पाटील यांचा इफेक्ट मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघात दिसून आला. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या भुमरे यांच्या तो पथ्यावर पडला.

इतर आठ मतदारसंघात मात्र महायुतीच्या विरोधात असलेला रोष मराठा समाजाने विरोधात मतदान करून व्यक्त केला. परिणामी रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, बाबुराव कदम, महादेव जानकर, अर्चना पाटील, सुधाकर शृंगारे हे युतीचे उमेदवार पराभूत झाले. जालन्यात काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी पाच टर्म खासदार असलेल्या रावसाहेब दानवे यांचा तब्बल 1 लाख 9 हजार मतांच्या फरकाने पराभव केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT