Ashok Chavan sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : आरक्षणासाठी सकल मराठा समाज आक्रमक; माहूरमध्ये अशोक चव्हाणांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडले!

Maratha society : जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत कुठल्याच नेत्यांचे वाढदिवस आनंद उत्सव साजरा होणार नाही, अशी भूमिका आंदोलकांकडून स्पष्ट करण्यात आली.

Mayur Ratnaparkhe

साजीद खान

Maratha Community Protestors : नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात माजी मंत्री अशोक चव्हाण यांचे वाढदिवसाचे बॅनर सकल मराठा समाजाच्या आंदोलकांकडून फाडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याचे वाढदिवस, आनंदोत्सव साजरे केले जाणार नाहीत, असा आक्रमक पवित्र आंदोलनकर्त्यांनी घेऊन राष्ट्रीय महामार्गावर स्टेट बँक चौकातील चव्हाण यांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यभरात सध्या मराठा आरक्षणाची ठिणगी उडाली असून, त्याचे लोन माहूर तालुक्यापर्यंत पोहोचले आहे. माहूर तालुक्यातील हडसणी, मदनापूर, करळगाव, सायफळ, रुई आदी गावांत साखळी उपोषण सुरू आहे, तर नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.

अशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याची माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाकडून शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर माहूर शहरात राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला भारतीय स्टेट बँक चौकात लावण्यात आले होते. सकल मराठा समाज बांधवांनी हे शुभेच्छा बॅनर त्या ठिकाणी जाऊन फाडले असून, प्रचंड घोषणाबाजी करत नेत्यांविरुद्ध असलेला रोष आंदोलकांनी यातून दाखवून दिला.

जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत कुठल्याच नेत्यांचे वाढदिवस आनंद उत्सव साजरा होणार नाही, अशी भूमिका आंदोलकांकडून स्पष्ट करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलक आता रस्त्यावर उतरले असून, येत्या काळात याचे पडसाद यापेक्षा तीव्र उमटतील असे दिसते.

मराठा आरक्षण उपसमितीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण यांना गत आठवड्यात धर्माबाद शहरामध्ये सुद्धा मराठा आंदोलकाच्या रोषाला समोरे जावे लागले होते. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले होते, तर आज माहूरमध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या शुभेच्छा बॅनरला आंदोलकांनी लक्ष्य केले.

त्यामुळे विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारसह तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवरसुद्धा मराठा समाजाचा रोष असून, मराठा आरक्षण उपसमितीचे अशोक चव्हाण हे माजी अध्यक्ष असल्याने त्यांच्यावर आंदोलकांची अधिकच नाराजी आहे, अशा चर्चांनासुद्धा पेव फुटले आहे. काँग्रेसच्या जबाबदार स्थानिक नेत्यांनी मात्र हे बॅनर अतिउत्साही कार्यकर्त्यांनी लावले होते, असे म्हणून वेळ मारून नेली हे विशेष म्हणावे लागेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT