Chhagan Bhujbal - Manoj Jarange  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या विरोधासाठीच 'येवलावाला' प्रयत्नशील, जरांगेंची भुजबळांवर टीका !

Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : मराठ्यांना आता चारही बाजूने घेरलेले आहे. आता आपल्याला न्याय मिळणार नाही, असा मेसेज मराठा समाजात गेला आहे. त्यामुळे आता आरक्षण लढूनच मिळवावे लागणार आहे..

Chaitanya Machale

Jalna News : मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळू नये, यासाठी राजकीय फायद्यासाठी येवलावाला प्रयत्न करत असल्याची टीका मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता केली. मराठ्यांच्या विरोधात ओबीसींचे नेते येवलावाल्याने एकत्र केले असून आता मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्र यावं, हीच वेळ आहे, असे आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी ओबीसी समाजाचे नेते आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव न घेता त्यांच्यावर कडाडून टीका केली. मराठा समाजाची गोरगरीब पोरं मोठी व्हावी यासाठी मी लढतोय. गेल्या वर्षे दीड वर्षापासून हा लढा सुरू आहे. मात्र यामध्ये काही ओबीसीचे नेते खोडसाळपणा करत आहेत. येवलावाला राजकीय फायद्यासाठी हा उद्योग करत आहे. त्यानेच ओबीसींचे नेते एकत्र केले असल्याचे जरांगे म्हणाले.

मराठ्यांना आता चारही बाजूने घेरलेले आहे. आता आपल्याला न्याय मिळणार नाही, असा मेसेज मराठा समाजात गेला आहे. त्यामुळे आता आपल्याला मराठा आरक्षण तसेच मिळणार नाही तर ते आता लढूनच मिळवावे लागणार आहे. ओबीसींचे नेते ज्या पद्धतीने एकत्र आलेले आहेत. तसेच आता मराठा आमदारांनी देखील एकत्र यावे, आणि सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलावे. सध्याची परिस्थिती पाहता हे सर्व मराठा आमदार अधिवेशनात मराठा आरक्षणाची मागणी करतील असं वाटतंय, असेही जरांगे पाटील म्हणाले.

अंतरवली सराटी या गावावर ड्रोनने टेहळणी केली जात असल्याच्या प्रकाराबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, गावात ड्रोन फिरून ते काय मारतात मला, कोणी त्या नादात पडू नये. हे फिरणारे ड्रोन टप्प्यात येत नाही. नाहीतर एका दगडातच आम्ही त्याला पाडून टाकू. ते ड्रोन खूपच लांब आहे. मी मॅनेज होत नाही,

ते आमची निष्टा विकत घेऊ शकत नाही. त्यातच आता मोठ्या संख्येने मराठा (Maratha) समाज एक झाल्यानं त्यांचं पोट दुखतंय. गावावर आणि माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी कितीही ड्रोन फिरवा, मी घाबरणारा नाही. मी कोणाला घाबरत नाही. माझा रस्ता क्लिअर आहे. मराठा समाजाला टक्कर देण्याचं कोणी काम करू नये, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT