Nanded Politics .jpg Sarkarnama
मराठवाडा

Nanded Maratha Protest: मराठा आंदोलकांनी शिवसेनेच्या आमदारांना रॅलीतून हाकललं, नांदेडमध्ये नेत्यांच्या घरासमोर पोलिसांचा खडा पहारा

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या मागण्यांवर अंमलबजावणी सुरू करत असल्याचे सांगितले आहे.

Jagdish Pansare

Nanded Politcs : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. दरम्यान, दोन दिवसापुर्वी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची खालावलेली प्रकृती पाहून मराठा समाज संतप्त झाला होता. रास्तारोको, बंदचे आवाहन आंदोलकांकडून करण्यात आले होते.

नांदेड बंद सुरू असताना शुक्रवारी(ता.4सप्टेंबर) आंदोलकांनी रॅली काढली होती. या रॅलीत शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, आनंद बोंढारकर सहभागी झाले होते. मात्र, संतप्त आंदोलकांनी त्यांना हुसकावून लावले. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींच्या घरासमोर पोलीसांचा खडा पहारा लावण्यात आला आहे.

खासदार अशोक चव्हाण यांच्या नांदेड शहरातील बंगल्यासमोरही पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. मराठा आंदोलकांकडून आक्रमक आंदोलने होण्याची शक्यता असल्याने पोलिस विभागाने दक्षता घेतली आहे.

नांदेड जिल्ह्यात सर्वच लोकप्रतिनिधीच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात नऊ आमदार, दोन राज्यसभेचे खासदार, एक लोकसभा खासदार आणि दोन विधान परिषद सदस्य आहेत. या सर्व 14 लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानाबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मराठा आंदोलनांदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस दलाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

नांदेडमध्ये शुक्रवारी सकल मराठा समाजाकडून बंद पुकारण्यात आला होता. या बंद दरम्यान मराठा आंदोलकांनी शिवसेनेच्या दोन आमदारांसमोर घोषणाबाजी करून त्यांना रॅलीमधून बाहेर जाण्यास भाग पाडले. आंदोलकांचा राजकीय नेत्याबाबत रोष दिसून येत असल्याने पोलिसांनी सर्व आमदार, खासदारांच्या निवासस्थानी सुरक्षा दिलीआहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार प्रसाद लाड यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मनोज जरांगे पाटील यांनी पाणी घेतले व सलाईन लावण्यासही परवानगी दिली.

मात्र, हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रांचे प्रत्यक्षात वाटप सुरू होत नाही तसेच मुंबई, सातारा, कोल्हापूर, औंध गॅझेट लागू होत नाही तोपर्यंत आपले बेमुदत उपोषण सुरूच राहणार, असे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या मागण्यांवर अंमलबजावणी सुरू करत असल्याचे सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT