Manoj Jarange Ashok Hinge Prakash ambedkar.jpg sarkarnama
मराठवाडा

Ashok Hinge : 'वंचित'च्या भूमिकेने अशोक हिंगेंची अडचण, प्रकाश आंबेडकरांपासून दूरावा?

Datta Deshmukh

Ashok Hinge News : वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून 2019 ची बीड विधानसभा आणि नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक लढवणारे वंचितचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यापासून दुरावल्याचे चित्र आहे. आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा जिल्ह्यातून गेली तरी हिंगे कुठेच सोबत नव्हते.

अशोक हिंगे यांची पार्श्वभूमी कायम मराठा आरक्षण आंदोलक, अशी राहिलेली आहे. तर,प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका त्यांना पटली नसल्यानेच ते दुरावल्याचे वंचितच्या सुत्रांचे म्हणणे आहे.

मराठा महासंघातून आपल्या सामाजिक कामाची सुरुवात करणारे अशोक हिंगे अनेक वर्षे काँग्रेसमध्ये Congress कार्यरत होते. मात्र, त्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयात सातत्याने आग्रही भूमिका घेतली. आंदोलनाने त्यांच्यावर अनेक गुन्हेही नोंद आहेत. दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यांना बीड विधानसभेची उमेदवारीही देण्यात आली.

मागच्या दोन वर्षांपूर्वी पक्षाने त्यांना मराठवाडा विभागीय अध्यक्षपदाची संधी दिली. या काळात त्यांनी पक्षाच्या माध्यमातून गायरान, दलितांवरील अत्याचाराच्या विरोधात आंदोलने केली. पक्षाकडून त्यांनी बीड लोकसभा निवडणुकही लढविली. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मागच्या वर्षीपासून सुरु केलेल्या आंदोलनात त्यांच्या भूमिकेचे समर्थन करणाऱ्या वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर Prakash ambedkar यांनी आता आरक्षण बचाव यात्रा काढून कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची थेट मागणी केली.

या भूमिकेमुळेच अशोक हिंगे त्यांच्यापासून दुरावल्याचे पक्षातील सुत्रांचे म्हणणे आहे. नुकतीच अॅड. आंबेडकरांची यात्रा जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, कडा आदी विविध भागांतून गेली. मात्र, या यात्रेत अशोक हिंगे कुठेच दिसले नाहीत. पक्षप्रमुखांची आरक्षणाबाबतची भूमिका न पटल्याने अशोक हिंगे नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT