Laxman Hake Sarkarnama
मराठवाडा

Laxman Hake News : 'मराठा आरक्षण म्हणजे राजकीय वर्चस्वासाठी घातलेला घाट' ; लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप!

Dattatrya Deshmukh

Laxman Hake at Kaij News : मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतू, ईडब्ल्यूएस आणि दहा टक्के आरक्षण असतानाही मराठा समाज आरक्षणासाठी लढा देत आहे. खरे तर मराठा आरक्षण लढा हा राजकीय वर्चस्वासाठी घातलेला घाट आहे असा आरोप ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला.

प्रा. हाके यांची बुधवारी केज तालुक्यातील नांदूरघाट येथे सभा झाली तसेच आष्टीत पत्रकार परिषद झाली. यावेळी प्रा. हाके यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यावरही टिका केली.

प्रा. हाके(Laxman Hake) म्हणाले, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची मुख्य मागणी आहे. ओबीसीतील बारा बलुतेदार आणि 18 पगड जातींचे आरक्षण टिकले पाहिजे यासाठी आमचा लढा सुरु आहे. कुठल्यातरी एका व्यक्तीने झुंडशाहीच्या जोरावर सर्व लोकांना एकत्र करून मला आरक्षण मिळालं पाहिजे, मी आरक्षण घेणारच असं म्हणणं म्हणजे हे घटना विरोधी वक्तव्य आहे. लोकशाहीच्या मलभूत तत्वाचा हा अवमान आहे. ही हुकूमशाही वृत्ती आहे. एका आंदोलकाने पाडापाडीची भाषा करणे योग्य नाही असे प्रा.लक्ष्मण हाके म्हणाले.

पावसातही समाज बांधव मेळाव्याला थांबून हेाते. दरम्यान, राज्यात चारशेहून अधिक जाती ओबीसीमध्ये आहेत. जरांगे यांच्याकडून ओबीसी आरक्षणात घुसखोरी केली जात आहे. राज्यातील प्रस्थापितांनी मनोज जरांगेना समोर केले आहे. संविधानात आरक्षणाचे धोरण ठरलेले असून दुय्यम वागणूक मिळालेल्या समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आरक्षण लागू केले आहे.

औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती बी. एच. मार्लपल्ली यांनी सांगितले आहे की कुणबी आणि मराठा एक म्हणणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा आहे. यासाठीच ओबीसी आरक्षण बचाओ जन आक्रोश यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन जाणार असून ओबीसी समाजाची जागृकता करणार असल्याचे प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे म्हणाले.

मनोज जरांगे(Manoj Jarange) यांच उपोषण बेकायदेशीर व घटनाबाह्य असल्याचाही आरेाप त्यांनी केला. आरक्षण मागणारा लाजिरवाणा, शोषित असतो, बघून घेईन म्हणणारा तसेच मुख्यमंत्री व शासन व्यवस्था वेठीस धरणारा मागास असू शकतो का असा प्रश्न हाके यांनी उपस्थित केला. सरकार सत्यापासून दूर पळालं तर जरांगे नावाचं भूत तुमच्या मानगुटीवर बसेल. तुमचा घात करेल व तोंड काळ करण्याची वेळ तुमच्यावर येईल अशी जहरी टीका प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली.

जरांगे यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून पंचायत राज मधील ओबीसींच प्रतिनिधित्व संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलनकर्ते आमदारकी,खासदारकी व मुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्व टक्केवारीवर बोलायला तयार नाहीत. यशवंतराव चव्हाण पासून आज पर्यंत हेच मेरीट सेट आहे. यामुळे ही लढाई आरक्षण गरजवंतांची नसून वर्चस्वासाठीची आहे अशी टीका प्रा.हाके यांनी केली.

राज्यात मराठा समाज हा शासक, पाटील, मालक, जागीरदार, वतनदार, आमदार, खासदार व कारखानदार आहे. संविधानात सामाजिक अपंग असणाऱ्या समाजाला आरक्षणाची मुभा दिलेली आहे. मराठा समाज आरक्षणाच्या निकषात बसत नाही. ओबीसी विरोधात षडयंत्र करण्यात मराठा आमदार, खासदार व नेत्यांचा हात असल्याचा आरोप प्रा.हाके यांनी यावेळी केला.

सन 1994 व 2024 हे ओबीसीच्या इतिहासातील सुवर्ण पान आहेत. ओबीसी आरक्षण बचाव व जन आक्रोश यात्रेला महाराष्ट्रात भरपूर प्रतिसाद मिळत असून नवे पर्व ओबीसी सर्व हिच घोषणा यानिमित्ताने दिली जात आहे. ओबीसी आरक्षणाची लढाई फार मोठी आहे. ही सुरुवात असून आम्ही ओबीसींच्या हक्क, अधिकार, स्वातंत्र्य, न्यायाची, स्वाभिमानाची व संविधानाला अपेक्षित असलेली लढाई लढू आणि फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र काय आहे हे येणाऱ्या काळात दाखवून देऊ असा इशारा देखील प्रा.लक्ष्मण हाके यांनी यावेळी बोलताना दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT