Mano Jarange  Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation: जरांगे पाटलांना हार घालणाऱ्या दोन व्यक्तींना भुजबळ समर्थकांकडून धमकी ?

Mano Jarange Dharashiv : जरांगे पाटलांनी पुन्हा महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे.

Ganesh Thombare

Dharashiv News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने आश्वासन दिल्यानंतर जरांगे पाटलांनी आपले उपोषण काही दिवसांसाठी स्थगित केले. मात्र, आता जरांगे पाटलांनी पुन्हा महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. जरांगे पाटलांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात येत आहे.

पण आता मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी एक टनाचा हार घालण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या माळी समाजातील भगवान ओहाळ, दत्तात्रय तोडकर यांना धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक येथील छगन भुजबळ यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी ही धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवरच ते धाराशिव, बीड, पुणे, सोलापूर, कल्याणसह अजून काही जिल्ह्यांत जंगी सभा घेणार आहेत. या अनुषंगानेच धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे मनोज जरांगे पाटलांना माळी समाजाकडून हार घालून स्वागत करण्यात येणार आहे. पण याआधीच त्या नागरिकांनी आपल्याला धमकी देण्यात आल्याचा आरोप केला आहे.

"कितीही धमक्या आल्या तरी आम्ही घाबरणार नाही, मराठा समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे, तो त्यांचा अधिकार", अशी भूमिका वाशी येथील माळी समाजाने घेतली आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी सरसकट कुणबी प्रमाणत्र देण्यास विरोध केल्यामुळे जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. यातच जरांगे पाटलांना हार घालणाऱ्या दोन व्यक्तींना भुजबळ समर्थकांकडून धमकी देण्यात आल्याच्या आरोपामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Edited by : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT