Manoj Jarange Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange News : मनोज जरांगेंविरोधात बीडमध्ये गुन्हे दाखल; सरकारकडून कडक पावलं उचलण्यास सुरुवात!

Datta Deshmukh

Beed Maratha Reservation Agitation News : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राबाबत सगेसोयरे कायदा लागू करावा, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषण केल, शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करून, ते मुंबईच्या दिशेनेही निघाले होते. मात्र त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून समजूत घालून रोखण्यात आले. दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीसांवर जरांगे यांनी केलेल्या आरोपानंतर सरकारने जरांगेंविरोधात कडक भूमिका घेण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मराठा आंदोलकांवरील किरकोळ स्वरुपातील आंदोलनाचे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रीया तर ठप्प झालीच आहे. शिवाय मनोज जरांगे यांच्यावरही दोन गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, सोमवारी इंटरनेट सेवा बंद केल्याने अर्धाहून अधिक दिवस जिल्ह्यात विस्कळीत गेला. याशिवाय एसटी बसच्या 59 फेऱ्या रद्द झाल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीच्या आंदोलनाचे सुरुवातीपासून बीड जिल्ह्यात मोठे पडसाद उमटत आहेत. मागच्या काही काळापासून सरकारने आंदोलनाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. यापूर्वी जिल्ह्यात जाळपोळ, दगडफेकीसह धरणे, रास्ता रोको, टायर जाळणे आदी प्रकरणीही तब्बल 79 गुन्हे नोंद केले होते. गंभीर प्रकारांत जीवे मारण्याच्या प्रयत्नांच्या कलमांसह गुन्हे नोंद केले होते.

दरम्यान, आंदोलनात मनोज जरांगे यांच्यासोबत सरकारने केलेलेल्या चर्चेनंतर गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार टायर जाळने, रस्ते अडविणे असे 36 गुन्हे मागे घेण्याबाबत जिल्हा पोलिस दलाने संबंधीत न्यायलायांत प्रस्ताव दाखल केले होते. न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर हे गुन्हे मागे घेतले जाणार होते. मात्र, मनोज जरांगे यांनी रविवारी केलेले आरोप व आंदोलनामुळे आता सरकार पुन्हा आक्रमक झाले आहे.

गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया ठप्प करण्यात आली आहे. मंत्रालय पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तोंडी सुचनेनंतर पोलिस प्रशासनाने गुन्हे मागे घेण्याबाबतची प्रक्रिया थांबवली आहे. उलट आता मनोज जरांगे यांच्यावरच जिल्ह्यात दोन पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंद झाले आहेत.

दरम्यान, किरकोळ व गंभीर असे एकूण 79 गुन्हे नोंद झाले. शनिवारी जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी आष्टी, शिरुर, पाटोदा, अंभोरा, अंमळनेर, बीड ग्रामीण, पिंपळनेर, धारुर, युसूफवडगाव, दिंद्रूड, सिरसाळा आदी पोलिस ठाण्यांत 425 आंदोलकांवर 22 गुन्हे नोंद झाले. यात आता शिरुर कासार व अंमळनेर पोलिस ठाण्यात रास्ता रोको करण्यास भाग पाडले म्हणून मनोज जरांगे यांच्यावर गुन्हे नोंद झाले आहेत.

समाजाला 10 टक्के दिलेले आरक्षण टिकणारे नसून स्वतंत्र आरक्षण व सगेसोयरे कायदा लागू करण्याच्या मागणीसह इतर आरोप करत रविवारी (ता. 25) मनोज जरांगे यांनी मुंबईकडे जाण्याची घोषणा करुन त्यांनी प्रस्थानही केले. या पार्श्वभूमीवर सरकारने सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली. यामुळे शासकीय कार्यालयांच्या कामावर विपरीत परिणाम झाला. सर्व्हर लाईन सुरु असल्यामुळे बँकींग व्यवहार सुरुळीत होता. मात्र, खासगी व्यवस्थापने व बाजारपेठांतील व्यवहारांवरही याचा परिणाम जाणवला. नेटकरीही दिवसभ त्रस्त होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT