Maratha Reservation News Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा समाजाच्या सर्व्हेक्षणाचा दिवस ठरला, तब्बल एक लाख 25 कर्मचारी कामाला

Datta Deshmukh

Beed : मराठा समाजाच्या मागासलेपण शोधण्याचे काम महाराष्ट्र शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविले आहे. पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून यासाठी सर्व्हेक्षण केले जात आहे. त्यानुसार राज्यातील शहरी आणि ग्रामीण, महापालिका क्षेत्र भागातील मराठा समाज व सर्वच खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण मंगळवार (ता.23) पासून केले जाणार आहे. तब्बल एक लाख 25 हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी जात हे सर्व्हेक्षण केले जाणार आहे.

बीड जिल्ह्यात सर्व्हेक्षणासाठी प्रगणक पाच लाख 68 हजार 624 कुटुंबांकडे जाणार आहे. या 184 प्रश्नांच्या सर्व्हेक्षणात पहिला प्रश्न नाव, दुसरा प्रवर्गाचा आहे. ज्यांना कुठलेही आरक्षण नाही अशा सर्व खुल्या प्रवर्गाचे यात सर्व्हेक्षण होणार आहे. यासाठी 184 प्रश्नांची उत्तरे ऑनलाईन ॲपमध्ये भरले जाणार आहेत. यासाठी बीड जिल्ह्यासाठी 4012 प्रगणकांची व 278 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. पुणे येथील गोखले गोखले इन्स्टिट्यूट माध्यमातून हे सर्वेक्षण ( survey) केले जाणार आहे.

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ -मुंडे या जिल्हा स्तरावर नोडल ऑफीसर असून सहाय्यक नोडल ऑफीसर म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी असतील. तर, तालुका स्तरावर तहसिलदार आणि शहरी भागात नगर पालिका व नगर पंचायतींचे मुख्याधिकारी नोडल ऑफीसर असतील. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण केल्यानंतर शासनाने निवृत्त न्यायमुर्तींची समिती स्थापन करुन जिल्हा स्तरावर विविध जुन्या दस्तऐवजांतून कुणबी नोंदी शोधल्या आहेत.

जिल्ह्यात 13 हजार नोंदी आढळल्या

आत्तापर्यंत जिल्ह्यात 13 हजारांवर कुणबी - मराठा, मराठा - कुणबी, मराठा जात अशा नोंदी आढळल्या आहेत. दरम्यान, आता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपविले आहे. त्यानुसार पुणे येथील गोखले इन्स्टीट्युटच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील मराठा समाजासह सर्वच खुल्या समाजाचे सर्वेक्षण करणार आहे. दरम्यान, जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे 28 लाख 43 हजार असून पाच लाख 68 हजार 634 कुटुंब आहेत. या सर्व कुटूंबापर्यंत प्रगणक पोचणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यात खुल्या प्रवर्गातील कुटूंबांची संख्या पावणे तीन लाख आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT