Maratha Reservation  Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : बीड जिल्ह्यातील 'त्या' जाळपोळ-दगडफेकीत व्यक्तिगत इंटरेस्टच अधिक...

Datta Deshmukh

Beed News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. जाळपोळ, तोडफोडीसारख्या घटना घडल्या. पोलिसांनी या घटनांचा विविध दृष्टीने तपास केल्यानंतर यातून वेगवेगळे कांगोरे समोर येत आहेत. आंदोलकांत घुसून अनेकांनी 'व्यक्तिगत इंटरेस्ट' साध्य केल्याची बाब समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे आरक्षण मागणी आंदोलनाला गालबोट लावण्याचाही काहींचा हेतू समोर येत आहे.

मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीला उपोषण सुरू केल्यानंतर त्यांच्या समर्थनाथ जिल्ह्यातदेखील (ता. २५) पासून लोकशाही मार्गाने आंदोलने झाली. परंतु, शनिवारी एक बस जाळण्याचा व रविवारी दोन बसवर दगडफेकीची घटना घडली होती, तर सोमवारी सकाळी माजलगावला आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ झाली. त्यानंतर बीडमध्ये दुपारनंतर अशा हिंसक घटना घडल्या. मात्र, तत्पूर्वी सकाळच्या सत्रात शासकीय कार्यालये बंद करण्यात आली. दुपारपर्यंत हा प्रकार सुरू होता.

याच काळात आंदोलकांच्या घोळक्यात काही विघ्नसंतोषी मंडळी सामील झाली. आंदोलकांच्या भावना तर तीव्र होत्याच. त्याचा फायदा घेत या आंदोलकांत विघ्नसंतोषी जमाव घुसला. मराठेत्तरांसह काहींना ऐनवेळी मिळालेले ज्वलनशील साहित्य, लोखंडी रॉड विशिष्ट वाहनांतून आले, तसेच जाळण्यासाठी एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने टायर उपलब्ध होणे, तसेच सिमेंट रस्त्यांवर दगडांचा खच या बाबी या घटनांसाठी 'नियोजबद्धतेचाच' भाग असल्याचे ताब्यात घेतलेल्या संशयितांच्य चौकशींतून समोर येत असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, आंदोलकांच्या गर्दीत मग इतर घुसले आणि मग जाळपोळ, दगडफेक अशा घटना घडल्या. या सर्व प्रकारात राजकीय, वैयक्तिक रागासह काहींचा लूटमार करण्याचाही मुख्य हेतू होता, तर काही मंडळी फक्त आंदोलन बदनाम करण्यासाठी यात घुसल्याचे तपासातून समोर येत आहे.

आंदोलक व इतरांना बाहेरून येणारे 'आता इकडे जा, तिकडे नका, असे 'मेसेज' याच हेतूने होते. काही माइंड कंट्रोल ठेवून होते. मात्र, सर्व घटनानंतर यात गंभीर गुन्ह्यांमुळे शिक्षण करत असलेले विद्यार्थी यांच्या करिअरवरही डाग लागला आहे. दरम्यान, या घटनेनंतर दुसऱ्या दिवशीपासून जिल्ह्यात अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, राज्याचे विशेष पोलिस (Police) महानिरीक्षक एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे (Pune) रेल्वेचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे आदी अधिकारी बीडमध्ये काही दिवस तळ ठोकून बसलेले होते.

यातील एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून काम केलेले असल्याने त्यांचा जिल्ह्याशी संबंध आलेला आहे, तर पंकज देशमुख यांनीही काही काळ बीडचे प्रभारी पोलिस अधीक्षक म्हणून काम केलेले आहे, तर श्रीकांत धिवरे यांनीही जिल्ह्यात अपर पोलिस अधीक्षक म्हणून काम केलेले आहे. या अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, गुन्हे आदी सर्वच बाबींचा पूर्वानुभव असल्याने गृह विभागाने त्यांना बीडला पाठविले होते. त्यामुळेच या घटनांतील विविध कांगोऱ्यांपर्यंत पोलिसांना लवकर पोचता आले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT