Manoj jarange Patil News  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : पालकमंत्री अतुल सावेंचे नाव काढताच जरांगे पाटील का भडकतात ?

Jagdish Pansare

Marathwada Political News : मनोज जरांगे पाटील हे नाव मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे देशभरात पोहचले आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांचे उपोषण सोडवण्यासाठी अंतरवालीत आले तेव्हा ` ये मनोज जरांगे पाटील कौन है`, असं दिल्लीत मला लोक विचारत होते, अशा शब्दात त्यांचे कौतुक केले होते. (Manoj Jarange Patil News) डोक्यावरचे वाढलेले केस, फ्रेंच कट दाढी आणि काडीसारखी शरीरयष्टी असलेल्या मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनातून मराठा समाजाच्या एकजूटीची मजबूत मोट बांधली.

रोखठोक विचार, कुठलाही आडपदडा न ठेवता मंत्री, खासदार, आमदारांशी थेट मिडिया आणि माईकसमोर संवाद साधण्याच्या त्यांच्या कृतीवर मराठा समाज अक्षरशः फिदा आहे. त्यामुळे तोंडचोपडे पणा करणारे मंत्री, लोकप्रतिनिधींबद्दल जरांगे यांना प्रचंड राग आहे. (Jalna) जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे (Atul Save) यांचे नाव काढले की जरांगे पाटील भडकतात. आंदोलना दरम्यान, जेव्हा केव्हा माध्यमांनी त्यांना अतुल सावे यांच्या संदर्भात प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी तो उडवून लावल्याचे दिसून आले.

माजलगांव आणि बीडमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलना दरम्यान हिंसक घटना, जाळपोळीचे प्रकार घडले. (Maratha Reservation) यावर जेव्हा जरांगे पाटील यांना पालकमंत्री अतुल सावे यांच्यांशी तुमचे बोलणे झाले आहे का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला तेव्हा कोण पालकमंत्री? त्यांना जालना जिल्हा माहिती तरी आहे का? ते कधी गावातच आले नाही, मग त्यांना जाळपोळ आणि हिंसक घटनांबद्दल काय माहित असेल? असा टोला लगावला होता.

त्यांनतर दुसऱ्यांदा भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर गावातील गावंबदीचे पोस्टर फाडण्यावरून राडा झाला, याचा संदर्भ देऊन अतुल सावे यांच्याशी तुमचे बोलणे झाले का? असा प्रश्न पत्रकाराने जरांगे पाटील यांना विचारला. तेव्हा अतुल सावेंचा काय संबंध, ते जालन्याचे पालकमंत्री आहेत हेच कोणाला माहित नाही, ते कधी जिल्ह्यात आले का? असा उलट सवाल करत त्यांच्याबद्दल सोडून दुसरं काही तरी विचारा, असं म्हणत पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी अतुल सावे आपल्यासाठी दुर्लक्षितच असल्याचे दाखवून दिले.

अतंरवाली सराटीत आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीहल्लानंतर सरकारच्या वतीने चर्चेसाठी पाठवलेल्या शिष्टमंडळात अतुल सावे यांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यातील उपोषण स्थगित करून जरांगे छत्रपती संभाजीनगरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते, तेव्हाही अतुल सावे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना सरकारी निर्णयाच्या आदेशाची प्रत प्रत्यक्ष भेटून दिली होती. दोन-तीन वेळा सावे आणि जरांगे यांची भेट झाली असली तरी त्यांच्यातील संबंध मात्र चांगले नाहीत, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. सावे हे फडणवीसांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT