tanaji sawant  Sarkarnama
मराठवाडा

Tanaji Sawant News : तुळजापुरात मंत्री तानाजी सावंतांनी मराठा आंदोलकांना दिला असा चकवा; प्रशासनाची खेळी ठरली यशस्वी

Maratha Reservation Protest Tanaji Sawant : मराठा आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. मंत्री आणि नेत्यांना प्रवेशबंदी आणि गावबंदी करण्यात येत आहे.

Sachin Waghmare

Dharashiv News : राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात तापला आहे. अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी २५ ऑक्टोबरपासून उपोषण सुरू केले आहे. त्यासोबतच मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्याआधारे आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील नेत्यांना मराठा आरक्षणावरून जाब विचारला जात असल्याने या आंदोलनाची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. गावोगावी नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळेच तुळजापुरात आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरास उपस्थित राहत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नव्याने तयार केलेल्या हेलिपॅडवर उतरून आंदोलकांना चकवा दिला.

तुळजापूर येथे घाटाच्या पायथ्याशी गुरुवारपासून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराची पाहणी करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत शनिवारी हेलिकाॅप्टरने येणार होते. त्यामुळे तुळजापुरात आल्यानंतर आक्रमक झालेले आंदोलक घेरतील याची शक्यता गृहीत धरून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासाठी ढेकरी रोड येथील खंडोबा मंदिरजवळ नव्याने हेलिपॅड तयार करण्यात आले होते. नळदुर्ग रोड येथे मोठे हेलिपॅड असताना केवळ आंदोलनकर्त्यांनी गोंधळ करू नये, त्यासाठी खंडोबा मंदिराशेजारी नवे हेलिपॅड तयार करण्यात आले. त्यामुळे ही आंदोलकांना चकवा देण्याची प्रशासनाने केलेली तयारी यशस्वी ठरली. त्यामुळे मंत्री सावंत यांना विनाअडथळा शिबिराच्या ठिकाणी पोहाेचता आले.

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील सुमारे दोनशेपेक्षा अधिक गावांत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यात वेगवेगळ्या शहरांत गावखेड्यात साखळी उपोषणे सुरू करण्यात आली आहेत. आरक्षणासाठी मराठा समाज आता चांगलाच आक्रमक झाला असून, मनोज जरांगे पाटील यांना ग्रामीण भागात पाठिंबा वाढत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. त्यासोबतच गावोगावी नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. यातून विरोधी पक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदारही सुटलेले नाहीत. त्यामुळे या मराठा समाजाच्या आंदोलनाची धास्ती सर्वच नेते मंडळीनी घेतली असल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT