Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde News : ''जाळपोळीमुळे इतर समाजाच्या मनात सुप्त ज्वालामुखी...''; पंकजांचं सूचक विधान

Datta Deshmukh

Beed News : आम्ही अनेक आंदोलने केली, बघितली मात्र असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. यामुळे आंदोलनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असून, इतर समाजाच्या मनात सुप्त ज्वालामुखी आहे. संविधानातले आरक्षण दिले तरच टिकेल व समाजात शांतताही टिकेल, असे मत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. आगामी डेडलाइन सामान्यांसाठी नसावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

आरक्षण मागण्याचा प्रत्येकाला अधिकार असून, त्यासाठी असा हिंसाचार कसा केला जाऊ शकतो, या हिंसाचाराचा आंदोलनांच्या नेत्यांनी निषेध केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

पंकजा मुंडे यांनी शहरातील विविध ठिकाणी झालेल्या जाळपोळींच्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी शिवछत्र येथे जाऊन माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्याशी संवाद साधला. तसेच, क्षीरसागरांच्या निवासस्थानी जाऊन आमदार संदीप क्षीरसागर, डॉ. दीपा क्षीरसागर, नेहा क्षीरसागर यांच्याशीही संवाद साधला. तसेच सनराईज हॉटेल, शिवसेना कार्यालय, भाजप कार्यालयाचीही त्यांनी पाहणी केली.

त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सोबत खासदार डॉ. प्रीतम मुंडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह पदाधिकारी होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाचे मोर्चे निघाले, धनगर समाजाने आंदोलन केले, राजकीय आरक्षणासाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला. मात्र, असला हिंसाचार कधी घडला नाही. कोणाच्या घरावर हल्ले करणे हे आंदोलन कसे असू शकते? असा सवाल त्यांनी केला. अशा घटना सुरू असताना जखमी हल्लेखोरांसाठी लगेच अॅम्ब्युलन्स येते, आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी येत नाही हे धक्कादायक असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

उद्या कोणीही सहज कोणाला काही देणार नाही. धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण हवे आहे, मात्र, सध्या एसटीमध्ये असलेले समूह काही त्यांचे स्वागत करणार नाहीत, तसेच ओबीसींचे आहे. अशा घटना पुन्हा होणार असतील, तर आम्हालाही आमरण उपोषणाला बसावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

या बाबतीत आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार का, या प्रश्नावर त्यांचे मंत्री आंदोलनाला भेटी देतात, त्यांना माहिती देतात. जिल्ह्याचे पालकमंत्री भेटतील. आपण त्यांचा वेळ घेणार नाही, पत्र देणार, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT