Central Committee Visit Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Drought : चार एकरात पस्तीस हजार खर्च, पावसाअभावी सगळं पिक वाया गेलं.. केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्याने मांडली व्यथा!

Marathwada Drought Central Team Visit: मराठवाड्यातील दुष्काळाची केंद्रीय पथकाने पाहणी केली. चार एकरांतील सोयाबीनसाठी ३५ हजार रुपये खर्च करूनही पीक वाया गेल्याची व्यथा शेतकऱ्याने मांडली. चारा टंचाईवर मात करण्यासाठी चारा बँक उभारण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली.

Jagdish Pansare

Central Committee Visit In Marahtwada : राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक चार दिवसीय दौऱ्यावर आहे. आज मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. दुष्काळग्रस्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देमनी गावात केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.

पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा अधिकाऱ्यांना सांगितल्या. पावसातील दीर्घ खंडामुळे सोयाबीनची पीक करपली आहेत. चार एकरांतील पिकासाठी ३५ हजार रुपये खर्च करूनही अपेक्षित उत्पन्न हाती न आल्याने आमचे मोठे नुकसान झाले आहे. आता हाती काहीच लागणार नाही, अशी व्यथा शेतकऱ्याने केंद्रीय पथकासमोर मांडली. त्यानंतर केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकप्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गेवराई येथे शेतकऱ्यांशी संवाद साधून दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी राज्याचे कृषी सचिव परिमल सिंग आणि बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन उपस्थित होते. शेतकरी मदन मोटे यांच्या तूर व कापूस पिकांची पाहणी करताना जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस नसल्याने झालेल्या नुकसानीची माहिती पथकाने घेतली.

विहिरी आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी स्वतःच्या खर्चाने टँकर मागवावा लागत असल्याची व्यथा मोटे यांनी मांडली. परिसरातील अन्य शेतकऱ्यांनी ऊस पीक जळून गेल्याचेही सांगितले. करपलेली पिके, आटलेले जलस्रोत आणि पाण्यासाठीची धडपड अशा दुष्काळामुळे शेतकर्‍यांच्या शेतीसह दैनंदिन जीवनावरही गंभीर परिणाम झाला आहे. केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून शेतकर्‍यांच्या या समस्या जाणून घेतल्या.

चारा बँक तयार करणार

मराठवाड्यात पाण्यासोबतच चाऱ्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. स्वतःसह पशूधन जगवण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. अशा परिस्थितीत जनावरांसाठी चारा बँक तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वनविभागाच्या मोकळ्या जमिनी, तलावाचा परिसर, शासकीय जमीनीवर गवताळ क्षेत्र विकसित करून चाऱ्याची व्यवस्था केली जाणार आहे.

या शिवाय भात उत्पादक भागातील भात पेंढ्या जाळण्याऐवजी संकलित करून चारा म्हणून उपयोगात आणल्या जाणार आहेत. उपलब्ध स्त्रोतांमधून जास्तीत जास्त चारा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असून रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी पिकांना प्राधान्य दिले जावे, असे आवाहन करण्यात आले आहे. चारा आणि दुष्काळ निवारणासाठी सीएसआरची मदत घेण्याची तयारीही प्रशासनाने चालवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT