

Congress by-election results : काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारविरोधात मतचोरीच्या आरोपांवरून रान उठविले आहे. राजधानी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत असतानाच देशातील एक लोकसभा आणि पाच विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. पहिला निकाल NDA च्या बाजूने लागला आहे.
पुडुचेरी येथील थट्टांचावडी या प्रतिष्ठेच्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ऑल इंडिया एन. आर. काँग्रेसचे उमेदवार अशोक आनंद यांनी काँग्रेसचे उमेदवार ई. विनायकगम यांचा पराभव केला आहे. अशोक आनंद यांनी ८ हजार ४८२ मतांनी विजय मिळविला आहे. त्यांना १३ हजार ३५८ मते मिळाली.
थट्टांचावडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एन. रंगासामी यांनी राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक झाली. ते दोन मतदारसंघातून विजयी झाले होते. रंगासामी हे ऑल इंडिया एन. आर. काँग्रेसचे प्रमुखही आहेत. तसेच हा पक्ष एनडीएमध्ये आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीने त्यांची लोकप्रियता पुन्हा एकदा सिध्द झाली आहे. अशोक आनंद यांनी तब्बल ६१ टक्के मते मिळविली आहेत. काँग्रेस उमेदवाराला केवळ २२ टक्के मते मिळाली.
दरम्यान, तामिळनाडूमध्येही धारापुरम आणि मदुरांतकम या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. दोन्ही मतदारसंघात मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. दोन्ही मतदारसंघात विरोधी पक्ष असलेला डीएमके दुसऱ्या तर अण्णाद्रमुक तिसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही मतदारसंघात अण्णाद्रमुखच्या आमदारांनी राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक होत आहे.
पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगर विधानसभा मतदारसंघ आणि आसाममधील नागांव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली आहे. या तिन्ही मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. काँग्रेसचे विधानसभेच्या तीन तर लोकसभेसाठी उमेदवार उतरविले होते. एकाही मतदारसंघात काँग्रेसचा निभाव लागू शकलेला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.