मराठवाड्यातील पूरस्थिती गंभीर होत असताना अंबादास दानवेंनी व्यंगात्मक टोला लगावला.
"देवा जरा इकडे बघ!" या वाक्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.
मुख्यमंत्री फडणवीसांवर पूरस्थिती हाताळण्याबाबत टीका होत आहे.
Shivsena UBT On Heavy Rainfall : मराठा आरक्षणाचा प्रश्न हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकाली काढला. याचा लाभ किती जणांना होतो हे अद्याप स्पष्ट झाले नाही, परंतु याचे श्रेय मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी पक्षात स्पर्धा लागली आहे. यातूनच राज्यभरात 'देवा भाऊ' अशी बॅनरबाजी सुरू आहे. यावरून विरोधक सत्ताधारी भाजपावर तुटून पडले आहेत.
अशातच शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मराठवाड्यातील बीड, नांदेडसह अनेक भागात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवरून देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. संपूर्ण मराठवाडा पूरात गेला आहे, शेतकरी, शेती, पीकं,जनावरे, घरांची पडझड अशा संकटात असलेल्या सर्वसामान्य लोकांकडेही 'देवा'बघा असा चिमटा काढणारी प्रतिक्रिया दिली आहे.
'देवा' जरा इकडे बघ! 'देवा'ने हे दिले.. 'देवा' ने ते दिले.. असा गजर सध्या गल्लीगल्लीतुन भाजपायी भक्तगण अगदी सूर्योदयापासून करताना दिसतात. कचराकुंडी लगतच्या भिंती ते बहुमजली इमारती अश्या सगळ्या ठिकाणी या 'देवा'चे फोटो लागले आहेत. ज्या शिवरायांच्या पायावर यांचे देवाभाऊ (Devendra Fadnavis) फुले वाहताना दिसतात, त्यांनी कधी आपली प्रजा वाऱ्यावर सोडली नाही.
नुसती फुले वाहून चालत नसतंय महोदय. विचार कृतीत उतरवावे लागतात. हे खालील दोन व्हिडियो बघून शिवराय आठवले तर त्यांच्या दुःखावर फुंकर घालता येते का बघा! नाही तरी तीन वर्षांपासून शेतकऱ्यांचा हाती फक्त पंचनामे.. पंचनामे आणि पंचनामेच येत आहेत! मदतीचा दमडा त्यांच्या खात्यात आलेला नाही, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
जनतेच्या भावनांशी खेळ
पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यामध्ये भारत मातेच्या 26 भावा-बहिणींचं रक्त सांडलं गेलं. त्या रक्ताच्या डागावर उभं राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळण्यासाठी परवानगी दिली. या देशातील जनतेच्या भावनांशी भारतीय जनता पक्षाचे केंद्र सरकार खेळत आहे, असा आरोप दानवे यांनी केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या वतीने माझ कुंकू, माझा देश म्हणत आंदोलन करण्यात आल्यानंतर स्पीड पोस्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'सिंदूर'च्या डब्या पाठवण्यात आल्या होत्या.
वाॅटरग्रीडचा पाईपही लागला नाही
सध्या मराठवाड्यात पूर परिस्थिती असली तरी ऐरवी हा भाग दुष्काळाशी कायम झटत असतो. राज्यात भाजपा- महायुतीचे सरकार असताना मराठावाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मराठवाडा वाॅटरग्रीड ही योजना देवा भाऊंनी आणली होती. मराठवाडा वॉटरग्रीड बाबत दिवास्वप्न दाखवून लोकांची दिशाभूल राज्य सरकारने केली.
'मराठवाड्यात दुष्काळ पाहणारी ही शेवटची पिढी..' असे गोंडस वाक्य ऐकणारी एक पिढी संपत आली आता. पण वॉटर ग्रीडचा एक पाईप लागला नाही! घोषणा करून केंद्राकडे मदतीचे डोळे लावून बसल्याचे ढोंग केले. लोकांना उल्लू बनवण्यात केंद्र सरकार यांचीच सुधारित आवृत्ती निघाले, अशी टीकाही अंबादास दानवे यांनी या निमित्ताने केली आहे.
FAQ
१. मराठवाड्यातील पूरस्थिती का गंभीर झाली आहे?
-मुसळधार पावसामुळे नद्या तुडुंब भरून वाहत आहेत.
२. अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना काय म्हटले?
- "देवा जरा इकडे बघ!" असा व्यंगात्मक टोला त्यांनी लगावला.
३. या वक्तव्याचा राजकीय परिणाम काय झाला?
- महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली.
४. मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका का होत आहे?
- पूरस्थिती प्रभावीपणे हाताळण्यात अपयश आल्याचा आरोप आहे.
५. दानवेंचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले का?
- होय, त्यांच्या या टोमण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.