Marathwada Graduate Constituency Election, Sarkarnama
मराठवाडा

Marathwada: पदवीधर निवडणुकीचा बिगुल वाजला; मराठवाडा मतदार संघासाठी महायुतीतच संघर्ष भडकणार?

Marathwada Graduate Constituency Election: मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे बिगुल वाजले असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागेसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार सतीश चव्हाण पुन्हा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhaji Nagar : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांची घोषणा काल करण्यात आली. गेल्या तीन-चार वर्षात राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हे चित्र पाहता मराठवाड्यातील पदवीधर व शिक्षक अशा दोन मतदारसंघासाठी सत्ताधारी महायुतीमध्येच संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा विचार केल्यास गेल्या 18 वर्षांपासून या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत पकड राहिली आहे. विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी ही जागा भाजपकडून खेचून घेतली होती. 2008 पूर्वी या मतदारसंघावर भाजपची मजबूत पकड होती. जयसिंगराव गायकवाड, श्रीकांत जोशी यांच्या रूपाने पदवीधरांचे प्रतिनिधित्व भाजपकडे होते.

परंतु 2008 पासून सातत्याने तीन वेळा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दिवंगत नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना-भाजप युतीच्या महायुतीमध्ये सहभागी झाला होता. तीन टर्म जागा जिंकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या मतदारसंघावर सहाजिकच पहिला दावा असणार आहे.

चौथ्यांदा मराठवाडा पदवीधर मतदार संघातून विद्यमान आमदार सतीश चव्हाण हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. महिनाभरापूर्वी आपल्याला पक्षाकडून तसा आदेश मिळाला असल्याचीही चव्हाण यांनी स्पष्ट केले होते. तर दुसरीकडे सुरुवातीपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपने ही जागा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

या मतदारसंघासाठी वर्षभरापूर्वीच भाजपने प्रभारी नेमून मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. भाजपकडून देखील मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. आता हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःकडे राखणार की महायुतीत सत्ताधारी भाजपाच्या दबावापुढे झुकत मतदारसंघ सोडणार? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन सत्ताधारी मित्र पक्षांमध्येच रस्सीखेच होणार असे दिसते.

पावणेतीन लाख मतदार ठरवणार आपला आमदार

मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी दोन लाख 88 हजार 783 मतदार आपला प्रतिनिधी निवडणार आहेत. या मतदारसंघासाठी 12 जानेवारीला अंतिम यादी प्रसिद्ध झाली होती यानंतरही साडेदहा हजार नवे मतदार नोंदणी अर्ज प्राप्त झाले होते.

एक नोव्हेंबर 2015 च्या यादीनुसार मराठवाडा विभागात दोन लाख 40 हजार 549 मतदारांची नोंद होती त्यानंतर नव्याने समाविष्ट झालेल्या 48 हजार 234 नावांची यादी भर पडली अंतिम मतदार यादीनुसार दोन लाख 88 हजार 786 मतदार येणाऱ्या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT