Marathwada MLC Election: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत अपेक्षेप्रमाणे महायुतीचे सतीश चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डाॅ. प्रतापसिंह पाटील यांच्यात थेट लढत होत असल्याचे चित्र आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात झाली. प्रत्यक्षात दुपारी तीननंतर टपाली मतमोजणीला सुरूवात झाली. एकूण ५१५ पोस्टल मतांपैकी २१ मते बाद झाली असून, ४९४ मते वैध ठरली आहेत. संपूर्ण टपाल मतांची नोंदणी संपली असून सतीश चव्हाणयांना १८७ तर महाविकास आघाडीच्या प्रताप पाटील यांना १५९ मते मिळाली. सतीश चव्हाण यांनी पोस्टल मतांमध्ये २८ मतांची आघाडी घेतली आहे.
काही फेऱ्यांमध्ये महाविकास आघाडीच्या प्रतापसिंह पाटील यांनी आघाडी घेतली होती, त्यानंतर सतीश चव्हाण आणि त्यांच्या मतातील फरक हा ३, १३ आणि आता ३७ तर सगळी टपाल मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा २८ एवढा राहिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे यांना ४० तर अपक्ष रविराज साबळे यांना ३१ टपाली मते मिळाली आहेत. टपाल मतमोजणीमध्येच महायुतीच्या सतीश चव्हाण यांच्या तोंडाला प्रतापसिंह पाटील यांनी फेस आणल्यामुळे निकाल काय लागणार? याची उत्सूकता ताणली गेली आहे.
सतीश चव्हाण यांनी विजयी चौकाराचा दावा केला आहे. तर पाटील यांनी परफेक्ट नियोजनाच्या माध्यमातून विरोधी उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याची प्रतिक्रिया मतमोजणी केंद्रावर दिली होती. तर आमचा विजय निश्चित आहे, मी सोबत गुलाल घेऊनच आलो आहे, असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दिलीप घुले हे टपाली मतदानामध्ये तरी कुठे दिसत नाहीत.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी एकूण ३ लाख २६ हजार ७०० मतदारांपैकी १ लाख ९१ हजार ६८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण ४१ उमेदवार रिंगणात असून ८४२ मतदान केंद्रावर झालेल्या मतांची मोजणी आज सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू झाली. ७० टेबलवर पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीच्या तेरा फेऱ्या होणार आहेत. ७६ तालुके आणि आठ जिल्ह्याच्या या मतदारसंघावर गेल्या अठरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत पकड आहे. सतीश चव्हाण हे तीन टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात झाली असली तरी प्रत्यक्ष मोजणी दुपारी तीननंतर सुरू झाली. मतपत्रिकांची छाननी आणि अवैध मतपत्रिका बाजूला काढणे, वैध मतपत्रिकांवरील पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी, आवश्यक कोटा पूर्ण झाला नसल्यास, नियमानुसार कमी मते मिळवणाऱ्या उमेदवारांना बाद करून त्यांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीची मते हस्तांतरित करणे, अशा पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.