Marathwada news : मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी अखेर आज मतदान पार पडले. सकाळी मतदारांमध्ये असलेला निरुत्साह दुपारनंतर उत्साहात बदलला. दुपारी चार वाजेपर्यंत अंदाजे 55 ते 60 टक्के मतदान झाल्याचे बोलले जाते. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 'साम' टीव्हीच्या 'एक्झिट पोल'च्या अंदाजानुसार राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सतीश चव्हाण हे सलग चौथा विजय मिळवताना दिसत आहेत.
गेल्या तीन टर्म मराठवाडा पदवीधर मतदार संघावर मजबूत पकड राखून असलेल्या सतीश चव्हाण यांनी विजयी चौकार ठोकण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चौथ्यांदा मैदानात उतरवले. तीन टर्म आमदार असल्यामुळे निवडणुकीचा अनुभव, अठरा वर्षात केलेल्या कामांचे प्रगती पुस्तक पदवीधर आणि समोर ठेवत निवडून आल्यानंतर पुढील सहा वर्षात काय करणार याची ब्लू प्रिंट अशा तयारीत लढलेल्या सतीश चव्हाण यांचा चौथा विजय दृष्टीपथात आहे.
41 उमेदवार रिंगणात असताना सतीश चव्हाण आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील या दोन प्रमुख उमेदवारांमध्येच लढत झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिलीप घुले यांच्यासह मराठवाडा शिक्षक संघाचे सुशील गोटे, अपक्ष रविराज साबळे यांची नावे काही प्रमाणात चर्चेत होती.
परंतु, प्रत्यक्षात झालेल्या प्रचारामध्ये सतीश चव्हाण, प्रतापसिंह पाटील आणि काही प्रमाणात उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे दिलीप घुले हेच दिसले. महाविकास आघाडीकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे स्वतंत्र उमेदवार असल्याने मतविभाजनाचा फटका रेसमध्ये असलेल्या प्रतापसिंह पाटील यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली असतानाही महायुतीच्या भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांच्या भक्कम पाठिंबामुळे सतीश चव्हाण यांची बाजू मजबूत झाल्याचे बोलले जाते. सलग तीन टर्म या मतदारसंघात विजय मिळवल्यामुळे सतीश चव्हाण यांचा आत्मविश्वास दांडगा होता. त्याच आत्मविश्वासाने त्यांनी संपूर्ण निवडणूक यंत्रणा हाताळली. अठरा वर्षात काय केले या विरोधकांच्या हल्ल्याला सडेतोड उत्तर देत लेखाजोखा मांडला. पुढील सहा वर्षात काय करणार याचे व्हिजनही पदवीधरांना सांगितले.
सलग अठरा वर्षे आमदार असलेल्या सतीश चव्हाण यांच्या विरोधात अँटी इन्कमबन्सी असेल असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु आज झालेल्या मतदानानंतर ती फारशी दिसली नाही. महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील यांनी कमी वेळात प्रचारात वेग घेतला हे नाकारता येणार नाही. परंतु त्यांना सर्व मतदारांपर्यंत पोहोचता आली नाही ही वस्तुस्थिती ही नाकारता येत नाही.
खासदार सुप्रिया सुळे यांनी या निवडणुकीची सूत्र आपल्या हाती घेतली होती. मराठवाड्यात राजेश टोपे यांच्यासारख्या नेत्यावर जबाबदारी सोपवत प्रतापसिंह पाटील यांच्या रूपाने मराठवाडा पदवीधर मतदारसंघात बदल घडवणार असा विश्वास निर्माण करण्यात काही प्रमाणात यशही मिळवले. परंतु सतीश चव्हाण यांच्या यंत्रणे पुढे त्यांचे प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहेत. डिसेंबर 2020 मध्ये झालेल्या मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत पासष्ट टक्के एवढे मतदान झाले होते.
यंदाच्या निवडणुकीत मतदानाची ही टक्केवारी काहीशी घसरताना दिसते आहे. शिवाय 41 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे बॅलेट पेपरचा आकार, त्याची घडी केल्यानंतर तो मतपेटीत टाकताना करावी लागणारी कसरत, आणि त्यात होणारा उशीर याचा काहीसा फटका मतदानाच्या आकडेवारीवर दिसून येणार आहे. अद्याप मतदानाची अंतिम टक्केवारी समोर आली नसली तरी साम टीव्हीच्या एक्झिट पोल नुसार सतीश चव्हाण हे चौथा सलग विजय साकारताना दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.