Marathwada Graduate Constituency Election Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Graduate Constituency Election : मराठवाड्यातील पदवीधरांनी निवडला नवा चेहरा, सतीश चव्हाण यांच्या अठरा वर्षातील कागदी कार्याला नाकारले!

Marathwada graduate constituency election result 2026 : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी सतीश चव्हाण यांचा पराभव केला. प्रचारातील रणनीती, कामगिरीवरील प्रश्न आणि पक्षांतराची चर्चा निकालाच्या विश्लेषणात महत्त्वाची ठरली.

Jagdish Pansare

Marathwada Graduate Constituency News : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील धक्कादायक निकालाने गेल्या 18 वर्षापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सतीश चव्हाण यांची सगळी रणनीती कोलमडून पडली. शैक्षणिक संस्थांचे जाळे, प्रभावी प्रचार यंत्रणा, मतदारांशी थेट संपर्काचा दावा या सगळ्या जोरावर सतीश चव्हाण यांनी आतापर्यंत या मतदारसंघात तीन वेळा मैदान मारले. मात्र विजयी चौकार ठोकण्याची त्यांचे स्वप्न महाविकास आघाडीच्या एका खेळीने भंगले.

डॉ. प्रतापसिंह पाटील हा फारसा परिचित नसलेला परंतु शैक्षणिक संस्था चालवण्याचा अनुभव असलेला नवीन चेहरा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने घेतला. सतीश चव्हाण यांच्या 18 वर्षातील कामगिरीबद्दल पदवीधर सवाल उपस्थित करत होते. त्यांच्या विरोधात मतदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचा अंदाज महाविकास आघाडीच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला होता.

कोरी पाटी असलेला नवा उमेदवार देऊन सतीश चव्हाण यांची पहिली कोंडी करण्यात आली. ज्या शैक्षणिक संस्थांची जाळे तेथील कर्मचारी यांच्या माध्यमातून निवडणूक यंत्रणा हलवली जायची त्या संस्थांना यावेळी 'सच' नको असे निरोप पोहोचवले गेले. त्यानंतर 'अठरा वर्षात काय केले'? हा महायुतीच्या सतीश चव्हाण विरुद्ध निवडणुकीचा प्रमुख मुद्दा करण्यात आला.

अठरा वर्षात काय केले? याचे उत्तर पदवीधरांचे मिळावे बैठका आणि प्रचार सभांमधून देताना सतीश चव्हाण यांची दमछाक होताना दिसली. कार्यपूर्ती अहवाल, आणि सभागृहात केलेली भाषण याचा दाखला देऊन पदवीधरांसह सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांचा दावा काही मतदारांना पटला नाही. महाविकास आघाडीच्या प्रतापसिंह पाटील यांनीही प्रचारात सतीश चव्हाण यांना थेट लक्ष करण्यापेक्षा त्यांच्या अठरा वर्षातील कामावर पदवीधर समाधानी आहेत का? अशी विचारणा करत सहा वर्षात आपण काय करणार? याचे व्हिजन मतदारांसमोर मांडले.

प्रतापसिंह पाटील हे नवखे उमेदवार असल्याने त्यांच्यावर कुठलाही आरोप किंवा डाग नव्हता. त्यांची कोरी पाटी हीच त्यांना संधी देण्यासाठी पूरक ठरली. अवघ्या अठरा दिवसात मराठवाडा पदवीधर मतदारसंघांमध्ये हा बदल निश्चितच घडून आलेला नाही. सतीश चव्हाण यांच्या विरोधात असलेल्या पदवीधर मतदारांच्या मनातील सुप्त लाटा मतपेटीतून उसळल्या.

आधी निरोप मग यंत्रणा कामाला

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून मराठवाड्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना यावेळी पदवीधर मतदारसंघांमध्ये बदल घडवायचा आहे, असे निरोप पोहोचवले गेले. यापूर्वीच्या तीनही निवडणुकीत मराठवाड्यातील ज्या नेत्यांनी सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी मेहनत घेतली, त्यातीलच माजी मंत्री राजेश टोपे यांच्यावर प्रतापसिंह पाटील यांना निवडून आणण्याची मुख्य जबाबदारी सोपवण्यात आली.

मराठवाडा पदवीधर मतदार संघातून राजेश टोपे यांनीच लढावे अशी गळ सुरुवातीला त्यांना घालण्यात आली. परंतु त्यांनी नकार देत प्रतापसिंह पाटील यांच्यासारख्या नव्या चेहऱ्याचे नाव सुचवल्याची माहिती आहे. पक्षाच्या बैठकीत प्रतापसिंह पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आधी मराठवाड्यातील शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांना निरोप पोहोचवले गेले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री राजेश टोपे , पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे , बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह आठही जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना कामाला लावण्यात आले.

अत्यंत कमी वेळात आठ जिल्हे आणि 76 तालुक्यांच्या मतदारांपर्यंत सोशल मीडिया आणि काही ठिकाणी प्रत्यक्ष गाठीभेटी घेत प्रतापसिंह पाटील आणि त्यांची संपूर्ण प्रचार यंत्रणा पोहोचली. दुसरीकडे महायुतीचे सतीश चव्हाण मात्र एकाकी किल्ला लढवताना दिसले. आपल्या प्रचार यंत्रणेवर आणि थेट संपर्कावर प्रचंड विश्वास असल्याचा अति आत्मविश्वास त्यांना नडला.

विधानसभेसाठीची उडी अंगलट

2024 मध्ये विधानसभा लढवण्याचा सतीश चव्हाण यांचा अट्टाहास आणि त्यासाठी गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शरद पवारांच्या पक्षात मारलेली उडी पदवीधर मतदारांना खटकली. अर्थात सतीश चव्हाण यांचा तो प्रयोग फसलाच. परंतु त्यानंतर ज्या वेगाने त्यांनी पुन्हा घरवापसी केली ते पाहून अनेकांना धक्का बसला.

तीन टर्म निवडून दिलेल्या पदवीधर मतदारांना गृहीत धरून सतीश चव्हाण यांनी विधानसभेत जाण्यासाठी केलेले हे पक्षांतर मतदारांनी चांगलेच लक्षात ठेवले. त्याचा परिणाम म्हणूनही मराठवाडा पदवीधर च्या आजच्या निकालाकडे बघितले जाते. सतीश चव्हाण यांचा विजयी चौकार रोखण्यात महाविकास आघाडीचे प्रताप सिंह पाटील यशस्वी ठरले असले तरी आता त्यांची जबाबदारी अधिक वाढणार आहे. पदवीधरांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन त्यांना पुढील सहा वर्षात सतीश चव्हाण यांच्यापेक्षा सरस कामगिरी करून दाखवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

SCROLL FOR NEXT