Marathwada Politics : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्यानंतर आता उद्याच्या मतदानासाठी महायुती-महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी रणनिती आखली जात आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आता मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मतदार पुन्हा अनुभवी आमदार म्हणून सतीश चव्हाण यांना चौथ्यांदा संधी देणार, की मग बदल म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डाॅ. प्रतापसिंह पाटील यांना पसंती देतात? यावर तर्क लढवले जात आहेत.
महायुतीतील उमेदवारीवरून मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने आधी सतीश चव्हाण यांच्याविरोधात सूर आळवला होता, पण नंतर तो बदलला आणि भक्कम पाठिंबा जाहीर केला. परंतु त्यांच्याच पक्षाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट पक्षविरोधी भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका कायम ठेवली. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ६८२ मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज झाले आहेत. ४१ उमेदवारांचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे.
महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन टर्म आमदार राहिलेल्या सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली. सुरूवातीला त्यांच्या उमेदवारीवरून भाजपामध्ये नाराजी नाट्य घडले. पण ही नाराजी दूर करण्यात सतीश चव्हाण आणि भाजपाच्या नेत्यांना यश आले. भाजपाकडून एम. के. देशमुख यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. पण मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर त्यांनी माघार घेतली आणि सतीश चव्हाण यांचा प्रचारही केला.
दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दिलीप घुगे निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यासह मराठवाडा शिक्षक संघाचे सुशील घोटे हेही रिंगणात असल्याने निवडणुकीतील स्पर्धा बहुरंगी झाली आहे. विविध उमेदवारांनी आपापल्या संघटनात्मक संपर्काच्या आधारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.
सतीश चव्हाण यांनी यापूर्वीच्या कार्यकाळातील कामांचा आधार घेत मतदारांसमोर भूमिका मांडली. तर विरोधकांनी रोजगार, बेरोजगार पदवीधरांच्या समस्या, शिक्षण क्षेत्रातील प्रश्न आणि प्रतिनिधित्वाच्या कामगिरीवरून सत्ताधारी उमेदवाराला लक्ष्य केले. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवारांची वैयक्तिक प्रतिमा, पक्षीय पाठबळ आणि स्थानिक पातळीवरील संपर्क या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.