M.K.Deshmukh  Sarkarnama
मराठवाडा

BJP Marathwada : मुख्यमंत्र्यांचा एक फोन अन् भाजप उमेदवाराची पदवीधरमधून माघार; राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा जीव भांड्यात!

Marathwada Graduate Constituency : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर एम.के. देशमुख यांनी मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. परंतु ऐनवेळी त्यांनी माघार घेतली होती. त्यानंतर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची तयारी करत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.

Jagdish Pansare

Marathwada Graduate Constituency News : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या विरोधात भाजपच्या एम.के. देशमुख यांनी बंडखोरीची तलवार उपसली होती. माजी शिक्षणाधिकारी राहिलेल्या एम.के. यांनी दीड लाख मतदार नोंदणी केल्याचा दावा करत मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी द्या, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती.

वरिष्ठांवर दबाव वाढवण्यासाठी सतीश चव्हाण यांच्याविरोधात अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केला. परंतु आज माघारीच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर देशमुख यांनी बंडाची तलवार म्यान करत अर्ज मागे घेतला. या माघारीने सतीश चव्हाण यांचा जीव मात्र भांड्यात पडला आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर एम.के. देशमुख यांनी मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. परंतु ऐनवेळी त्यांनी माघार घेतली होती. त्यानंतर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची तयारी करत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.

पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी देण्याचे आश्वासन मिळाल्याचा देशमुख यांचा तेव्हा दावा होता. परंतु महायुतीत मराठवाडा पदवीधरची जागा राष्ट्रवादीकडे गेली. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भावना आणि पदवीधर मतदारांचे प्रश्न यांना प्राधान्य देण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे म्हणत एम. के. देशमुख यांनी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

देशमुख यांच्या उमेदवारीमुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्यासमोर भाजपमधील बंडखोरीचे आव्हान निर्माण झाले होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा अनुभव, भाजपमधील कार्यकर्त्यांशी असलेले संबंध आणि पदवीधर मतदार नोंदणीचा त्यांनी केलेला दावा यामुळे त्यांची उमेदवारी सतीश चव्हाण यांना धोकादायक ठरली असती.

अखेर उमेदवारी मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी भाजपचे एम. के. देशमुख यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढत अर्ज मागे घेण्यास सांगीतले. वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर एम. के. देशमुख यांनी माघार घेतली आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील बंडखोरी रोखण्याच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

मुख्यमंत्र्यांचा एक फोन अन् माघार!

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महायुतीकडून सतीश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, भाजपचे एम. के. देशमुख यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यानंतर देशमुख यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली.

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री अतुल सावे यांनीही देशमुख यांना फोनवरून सूचना दिली होती. त्यामुळे भाजपचे एम. के. देशमुख आता पदवीधर निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले आहेत. त्यांचा अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भाजपचे रामराव शेळके आले होते. भविष्यात पक्ष एम. के. देशमुख यांना त्यांचे काम पाहून योग्य संधी देणार आहे, तसा शब्द त्यांना देण्यात आला असल्याचे शेळके यांनी सांगीतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT