Marathwada Graduates Election | Satish Chavan vs Sanjay Kenekar Sarkarnama
मराठवाडा

MLC Election : अतुल सावे, भागवत कराडांचे तोंडावर बोट; संजय केणेकरांनी विषय लावून धरला; मराठवाडा पदवीधरसाठी मुंबईत तळ ठोकून

BJP News : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीची चर्चा असताना संजय केणेकर भाजपने जागा लढवावी यासाठी पाठपुरावा करत आहेत.

नवनाथ इधाटे

MLC Election : विधानपरिषदेची मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार आणि विद्यमान आमदार सतीश चव्हाण हेच उमेदवार असणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्याचवेळी भाजपचे माजी आमदार संजय केणेकर यांनी मात्र ही जागा भाजपने लढवावी, यासाठी आक्रमकपणे पाठपुरावा सुरू केला आहे.

मागील पाच दिवसांपासून संजय केणेकर मुंबईत तळ ठोकून असून, वरिष्ठ भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेत आपली भूमिका मांडत आहेत. एका बाजूला केणेकरांनी हा विषय लावून धरला असताना स्थानिक नेत्यांनी मात्र तोंडावर बोट ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते या विषयावर उघडपणे भूमिका मांडताना दिसत नाहीत.

‘पदवीधर’ भाजपकडे घ्या; केणेकरांचा वरिष्ठांकडे आग्रह

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ भाजपने लढवावा किंवा महायुतीतील घटक पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत करावी, अशी मागणी केणेकर यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पक्षाच्या कोअर कमिटीकडे त्यांनी आपली भूमिका मांडल्याचे सांगितले जाते.

सावे-कराडांची सावध भूमिका का?

एकीकडे केणेकर भाजपच्या वाट्याला ही जागा यावी, यासाठी जोरदार पाठपुरावा करत असताना अतुल सावे आणि भागवत कराड यांच्यासह स्थानिक भाजप नेते मात्र या विषयावर उघडपणे आक्रमक होताना दिसत नाहीत. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांशी संबंध बिघडू नयेत, यासाठी स्थानिक नेते सावध भूमिका घेत असल्याची चर्चा आहे. स्थानिक पातळीवर नेते सावध असताना केणेकरांनी थेट मुंबई गाठून वरिष्ठ नेतृत्वापुढे हा विषय नेल्याने त्यांच्या भूमिकेला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

केणेकर एकाकी पडले?

भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून उघड साथ मिळत नसल्याने संजय केणेकर या भूमिकेत एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करता केणेकरांनी गेल्या ५ दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून वरिष्ठ नेत्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा विषय लावून धरल्याचे केणेकरांकडून सांगितले जात आहे.

आता भाजप काय भूमिका घेणार?

दरम्यान, राज्यातील पाच पदवीधर मतदारसंघांच्या जागावाटपाचे चित्र जवळपास स्पष्ट झाल्याची चर्चा आहे. त्यानुसार मराठवाडा पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार असून, विद्यमान आमदार सतीश चव्हाण चौथ्यांदा निवडणूक लढवणार असल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत केणेकरांचा पाठपुरावा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला कितपत मान्य होतो आणि पक्ष मराठवाडा पदवीधरच्या जागेवर दावा कायम ठेवतो की महायुतीचा जागावाटपाचा निर्णय मान्य करतो, याकडे आता भाजप कार्यकर्त्यांसह महायुतीतील घटक पक्षांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT