Cm Eknath Shinde-Mla Sanjay Shirsat News, Aurangabad
Cm Eknath Shinde-Mla Sanjay Shirsat News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Marathwada : हृदयविकाराचा धक्का शिरसाटांना, पण वेदना शिंदेंना..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले तेव्हा त्यांच्या खांद्याला खांदा लावून उद्धवसेनेला अंगावर घेण्यात औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट हे आघाडीवर होते. तसं पाहिलं तर जिल्ह्यातून पाच आमदारांनी शिंदेंच्या बंडाला पाठिंबा दिला होता. पण सुरुवातीच्या काळात उद्धवसेनेवर हल्ला चढवण्याची जबाबदारी एकट्या संजय शिरसाट यांनी खांद्यावर घेतली होती.

पण मंत्रीमंडळ विस्तारात त्यांच्या या कामगिरीचे चीज करण्याचीवेळ आली तेव्हा मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची कोंडी झाली. जिल्ह्यातून मंत्रीपदासाठी इच्छूक तीन तर पदे दोन अशी अवस्था होती. (Marathwada) अशावेळी आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या भुमरे आणि सत्तारांना संधी देत शिंदेंनी आपल्या हक्काच्या माणसाला थांबण्यास सांगितले. (Sanjay Shirsat) शिरसाट यांनी देखील मुख्यमंत्र्यांचा आदेश शिरसावंद्य मानत सबुरीचे धोरण स्वीकारले.

अशा या आपल्या लाडक्या आमदाराला जेव्हा हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा त्यांच्या वेदना मात्र शिंदेंना झाल्याचे दिसून आले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बसलेले असतांना शिरसाट यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. तिथून बैठक सोडून ते तडक घरी गेले, पण अस्वस्थता अधिक वाटू लागल्याने त्यांनी रुग्णालयात धाव घेतली आणि त्यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का येवून गेल्याचे निदान झाले.

याची माहिती मुख्यमंत्र्यांना कळताच त्यांना देखील धक्का बसला. शिरसाट आणि त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून त्यांनी थेट मुंबईला घेवून या, असे सांगत एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली. शिरसाट मुंबईत दाखल होईपर्यंत लिलावती रुग्णालयातील तज्ञ डाॅक्टरांशी चर्चा करून तातडीने उपचार मिळण्याची व्यवस्था केली. शिरसाट तिथे दाखल झाल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री उपचारांचा आढावा घेत होते.

या शिवाय खासदार श्रीकांत शिंदे यांना लिलावतीत पाठवून विशेष लक्ष ठेवण्याचा सूचना देखील केल्या. काल संजय शिरसाट यांच्यावर अॅन्जीओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली. आता शिरसाट यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डाॅक्टारांनी कळवले आहे. सलग तीन टर्म आमदार असलेले संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे यांचे पहिल्यापासूनच जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असतांना शिरसाट यांच्या मतदारसंघासाठी शिंदे यांनी आपली तिजोरी अक्षरश: खुली केली होती. शिरसाट आपल्या भाषणात शिंदे साहेबांचे आपल्यावर किती प्रेम आहे हे आवर्जून सांगायचे. शिंदे यांच्या बंडात शिरसाटांची महत्वाची भूमिका होती. शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिरसाटांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घ्यायला देखील मागेपुढे पाहिले नाही.

उद्धव ठाकरे यांना सर्वात आधी पत्र लिहून पलटवार करणारे देखील शिरसाट हेच होते. त्यामुळे या बंडाला यश आल्यानंतर आपल्या पदरात मंत्रीपद पडेल याची अपेक्षा शिरसाट यांना होती. पण राजकीय घडामोडी आणि मंत्रीपदासाठीची स्पर्धा यात त्यांना थांबावे लागले. हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्यानंतर याचा संबंध मंत्रीपद न मिळणे यांच्याशी देखील जोडला गेला.

राजकीय विरोधकांनी तसा अपप्रचार माध्यमांवर केला देखील. पण ज्या पद्धतीने मुख्यमंत्री शिंदे शिरसाट यांना हृदयविकाराराचा झटका आल्यानंतर मदतीसाठी धावले, ते पाहता शिरसाट यांना डावलणे त्यांच्यासाठी देखील किती कठीण होते हे लक्षात येते. त्यामुळेच हृदयविकाराचा झटका जरी शिरसाटांना आला असला तरी वेदना मात्र शिंदे यांना अधिक झाल्याचे दिसून आले. शिरसाटांना मंत्रीपद मिळेल की नाही? या पेक्षा शिंदे यांचा शिरसाटांवर जीव आहे हेच यातून अधोरेखित झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT