Uddhav Thackeray Visit Aurangabad News
Uddhav Thackeray Visit Aurangabad News Sarkarnama
मराठवाडा

Marathwada : ठाकरेंच्या दौऱ्याने शेतकऱ्यांच्या पदरात काही पडेल का ? शिवसैनिक मात्र सुखावले..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिंदे गटाच्या बंडानंतर सर्वाधिक सुरुंग लागला तो मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याला. सहा पैकी पाच आमदारांनी शिंदे गटाची वाट धरल्यामुळे गेल्या ३०-३५ वर्षापासून बालेकिल्ला असलेला हा जिल्हा उद्धवस्त झाल्याची परिस्थिती निर्माण होते की काय? असे चित्र होते. एकीकडे पक्ष फुटला तर दुसरीकडे विरोधकांवर तुटून पडणाऱ्या नेत्यांवर ईडीची फास आवळला जात असल्याने उद्धव ठाकरे मुंबईत बसूनच पक्ष सावरण्याचा प्रयत्न करत होते.

आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा करत निष्ठा यात्रा काढली. त्याचा चांगला परिणाम दिसून आला आणि ठाकरे गटाला राज्यातील लोकांची सहानुभूती देखील मिळाली. (Shivsena) अंधेरी पोट निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना हे नांव आणि पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गमावल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुंबई बाहेर पडले. निमित्त होते परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान.

सत्ताधारी शिंदे-फडणवीस यांच्याकडून पंचनामे आणि मग मदत असे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली आहे. अशावेळी सरकारच्या विरोधातील चीड आणि आपल्याबद्दल असलेली सहानुभूती वाढवण्याठी उद्धव ठाकरेंनी काढलेला हा नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा असल्याचे बोलले जाते.

सत्ता गेल्यानंतर मुंबई बाहेरचा पहिलाच दौरा तो देखील मराठवाडा आणि ज्या जिल्ह्यातून सर्वाधिक आमदार शिंदे गटात गेले त्याच औरंगाबादची निवड हा निव्वळ योगायोग निश्चितच नाही. मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अधिक नुकसान आणि चिंतेची परिस्थिती आहे. परंतु ठाकरेंनी पहिली पसंती दिली ती कायम शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्याला.

गंगापूर तालुक्यातील दहेगांव आणि पेंढापूर गावात उद्धव ठाकरे यांनी भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला. धीर सोडू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, तातडीची मदत करायला सरकारला भाग पाडू, पण तुम्ही एकजूट कायम ठेवा, असे आवाहन करत ठाकरेंनी झालेल्या नुकसानीची नजर पाहणी केली. आमचे सरकार असतांना बांधावर न येता देखील तुम्हाला मदत दिली होती, याची आठवण देखील त्यांनी आवर्जून करुन दिली.

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांकडून टीका होऊ लागली आहे. पण या एकाच दौऱ्यातून उद्धव ठाकरे यांनी दोन गोष्टी साध्य केल्या. एक म्हणजे शेतकऱ्यांची सहानुभूती आणि पक्षफुटीनंतर हवालदिल झालेल्या शिवसैनिकांना बळ देण्याचे काम या दौऱ्यातून झाले. कुठलाही मेळावा किंवा सभा न घेता देखील या पाहणी दौऱ्यातून शिवसैनिकांना उर्जा मिळाली.

आगामी काळात औरंगाबाद महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. उद्धव ठाकरे यांना जशी मुंबई महापालिकेची सत्ता महत्वाची आहे, तशीच औरंगाबादेत शिवसेनेचा वचक कायम ठेवण्यासाठी देखील इथे सत्तेची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांनी काही महत्वाचे संघटनात्मक बदल देखील केले.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यातून शेतकऱ्यांच्या पदरात खरचं काही पडेल का? तर याचे उत्तर फारशी अपेक्षा बाळणगे चुकीचे ठरेल असेच द्यावे लागेल. विरोधकांनी ओरड करायची आणि सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करायचे ही पंरपराच कायम राहणार आहे. त्यामुळे हा दौरा म्हणजे एक सोपस्कारच ठरणार आहे.

या दौऱ्यातून शिवसैनिकांना मात्र बळ मिळणार आहे. अर्थात यापुढच्या काळात देखील उद्ध ठाकरे यांचे औरंगाबाद आणि मराठवाड्यात दौरे होणारच आहेत. पण पक्ष फुटीनंतर मनाची घालमेल सुरू असलेल्या शिवसैनिकांना ठाकरेंच्या या दौऱ्यानंतर निश्चितच दिलासा मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT