Marathwada Drought News: दुष्काळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजारांची मदत थेट खात्यात जमा करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. दिवाळी दोन दिवसांवर आली आहे, शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा दावा करणाऱ्या सरकारचे पाच हजार रुपये खात्यात जमा झाले का? याची शहानिशा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे दोन दिवसापासून छत्रपती संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. पाच हजाराची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असली तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले नाहीत, असा दावा ठाकरे यांनी या दौऱ्यात केला.
वैजापूर, कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांशी काल संवाद साधल्यानंतर आदित्य ठाकरे आज गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथे शेताच्या बांधावर गेले होते. शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. "सरकारने जरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असले तरी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. सत्ता असो की नसो, आम्ही शेतकऱ्यांची साथ कधीही सोडणार नाही", असा विश्वास ठाकरे यांनी यावेळी दिला.
गावाच्या पारावर शेतकऱ्यांसोबत बसून त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. पिकांची पाहणी, कर्जमाफीचा आढावा आणि शेतमालाला हमीभाव मिळतो आहे की नाही? याची विचारणाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. दुष्काळामुळे शेतीचे झालेले नुकसान, हाताला काम नसल्याने निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि ऐन दिवाळीच्या सणात घराघरांत निर्माण झालेल्या अडचणी जाणून घेत त्यांनी शेतकऱ्यांना खचून न जाता खंबीरपणे परिस्थितीला तोंड देण्याचे आवाहन केले.
"दिवाळीचा सण उंबरठ्यावर असताना शेतकऱ्यांच्या घरात आनंदाऐवजी चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा केवळ ऐकून न घेता त्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवत त्यांना मदतीसाठी सदैव पुढे राहू", असा विश्वासही दिला. कालच्या दौऱ्यात त्यांनी सोयाबीन, तूर, मूग आणि कापूस या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या संघर्षात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष खंबीरपणे पाठीशी असल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.
श्री क्षेत्र भांगशी माता गड, शरणापूर येथे ५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या भव्य सत्संग सभागृहाचा लोकार्पण सोहळा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यटन मंत्री असताना आदित्य ठाकरे यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. या सभागृहाची निर्मिती पूर्ण झाल्यानंतर आज त्यांच्याच हस्ते लोकार्पण करण्यात आले.
"सेवा हाच सर्वांत मोठा धर्म आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांना आधार आणि मानसिक बळ देणे हीच खरी समाजसेवा आहे. सत्तेत असो वा नसो, समाजसेवेचे कार्य अविरत सुरूच राहील",अशी भावना यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज, चंद्रकांत खैरे, उपनेते सुभाष पाटील, माजी आमदार उदयसिंग राजपूत यांची उपस्थिती होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.