Sambhaji Nagar Student Agitation: 'महाराष्ट्र विद्यार्थी कृती समिती स्पर्धा परीक्षा बचाव आंदोलन' समितीच्यावतीनं आज संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात आलं. देशभरात घडलेल्या पेपरफुटी आणि परीक्षांमधील गोंधळाविरोधात विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर एकवटले होते. भर पावसात यावेळी विद्यार्थ्यांची तुफान गर्दी झाली होती. यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा देखील दाखल करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांची उत्स्फुर्त आंदोलन होत आहेत, तसंच दिल्लीतील जतंरमंतर इथंही अभिजीत दिपकेंचं आंदोलन अद्याप सुरुच आहे. यापार्श्वभूमीवर आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्यातील शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्यांच्या मागणीसाठी दाबव वाढत असून आजचं आंदोलन त्यादृष्टीनं निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र जमले आहेत. या आंदोलनाला अभिजीत दीपके, विठ्ठल कांगणे, नितेश कराळे, आमदार रोहित पवार, अभिजीत दिपके, रविराज साबळे, दीपक केदार यांनी उपस्थिती लावली. या आंदोलनामध्ये पुढील मागण्या प्रामुख्यानं करण्यात आल्या. यामध्ये MPSC परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात, TET परीक्षा ऑफलाईन झाल्या पाहिजेत, पेपरफुटी रोखण्यासाठी पारदर्शक यंत्रणा राबवावी आणि दोषींना जन्मठेपेपर्यंत कठोर शिक्षा देणारा कायदा करावा, पोलीस भरती 2026 तातडीने जाहीर करावी व केवळ भरती प्रक्रिया पूर्ण करावी, शिक्षकांसाठी स्वतंत्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ची तात्काळ तारीख निश्चित करावी, विविध विभागातील रद्द/कालबाह्य केलेली लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदे पुनर्जीवित करावीत तसंच गट-ड व केंद्रीकरण पूर्णतः बंद करून कायमस्वरूपी भरती करावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी भाषण करताना रविकांत तुपकर म्हणाले, "विद्यार्थ्यांनी बिहारमध्ये आंदोलन केलं विद्यार्थ्यांच्या बिहारच्या आंदोलनाचा वणवा सबंध देशभर पेटला आणि विद्यार्थी आंदोलनाने इंदिरा गांधीचा सरकार घालवून या देशांमध्ये जनता पार्टीचे सरकार आणण्याचा इतिहास आहे लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी राजांच्या युद्धातले नियम लढाईतले नियम हेच आंदोलनाचे नियम असतात हे ही लक्षात ठेवा. आज महात्मा गांधीच्या मार्गाने आलो उद्या भगतसिंगाच्या मार्गाने येणार नाही. पुढचं आंदोलन मुबंईलाला घ्या, जे अंगावर येईल त्याला शिंगावर घेऊ"
अभिजित दिपके म्हणाले, 20 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केली आहे त्या मुलांना न्याय भेटला पाहिजे यासाठी आम्ही इथं बसलो आहोत. मुख्यमंत्र्यांना आम्हाला हे विचारायचं आहे की, सकाळी पाच वाजता नव्या सरकारची शपथ घेऊ शकता असं संविधानात कुठे लिहिलं होतं? जेव्हा आम्ही बोललो, विद्यार्थी परीक्षेचा मुद्दा उचलता तेव्हा या सरकारनं आम्हाला व्हायरस संबोधलं पण आम्ही व्हायरस नाही व्हॅक्सिन आहोत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, मोदी युद्ध थांबवतात पेपरफुटी का थांबवू शकत नाहीत? मोदी आमचं ऐकणार नाही तर डोनाल्ड ट्रम्प ऐकणार आहे का? पेपर ऑफलाईन झाली पाहिजे पेपर ऑफलाईन झाले नाही तर आम्ही सरकारला ऑफलाईन करू, अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी दीपक केदार म्हणाले, ज्याला TET म्हणजे काय हे कळत नाही तो आपला शिक्षणमंत्री आहे. शिक्षणाची थट्टा थांबवा, नाहीतर सत्ता हिरावून घेण्याची ताकद तरुणांमध्ये आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे माणसे नसतील तर आम्ही देतो. तुमच्या बुडात दम असेल तर ऑनलाईन परीक्षा घेण्याऐवजी आमदार खासदाराची एकदा TET घ्या, अशा शब्दांत केदार यांनी यावेळी सरकारला धारेवर धरलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.