गणेश पांडे
Parbhani ZP Election News : परभणी जिल्हा परिषदेत ऐनवेळी गेम फिरवत भाजपाचा अध्यक्ष करणाऱ्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर खऱ्या 'धुरंधर'असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आधी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका घेणाऱ्या मेघना बोर्डीकर यांनी झेडपी अध्यक्ष पदासाठी याच राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. ऐनवेळी साथ नाकारत केलेल्या या खेळीने संतापलेल्या शिंदेंच्या शिवसेनेने मग बहिष्कारास्त्र वापरले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
शेवटच्या क्षणापर्यंत सत्तासमीकरणांचा खेळ खेळल्या गेलेल्या परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत अखेर निर्णायक चाल खेळत मेघना बोर्डीकर यांनी विरोधकांच्या महाआघाडीचा फुगा फोडला. राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि अपक्ष यांची बांधलेली मजबूत भिंत या चालीने एका झटक्यात कोसळली. त्यानंतर भाजपाने पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत सत्ता काबीज केली.
सर्वाधिक 24 जागा जिंकूनही भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्याचा कट शिजवला जात असताना विरोधकांनी 'पॉवर पॉलिटिक्स'चे हत्यार वापरले. सदस्यांना सहलीवर पाठवण्यापासून ते अध्यक्षपद शिंदे गटाला देण्याच्या आमिषांपर्यंत सर्व डाव रचले गेले. मात्र, या सर्व राजकीय कारस्थानांना चोख प्रत्युत्तर देत मेघना बोर्डीकर यांनी सत्ता आपल्या बाजूला खेचली.
राजकीय पटावर परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्यांनी वरच्या पातळीवर थेट संवाद साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत आखलेली रणनीती निर्णायक ठरली. आवश्यक तेथे एक पाऊल मागे घेत, अनपेक्षितपणे राष्ट्रवादीसोबत हातमिळवणीचे धोरण स्वीकारत त्यांनी विरोधकांचा संपूर्ण खेळ उधळून लावला. या सत्तानाट्याचा शेवट भाजपाच्या ऐतिहासिक विजयाने झाला.
बिनविरोध झालेल्या निवडीत लता विजय वाकळे अध्यक्षपदी विराजमान झाल्या, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ॲड. श्रीकांत विटेकर यांची निवड झाली. हा केवळ विजय नाही, तर विरोधकांच्या अहंकारावर केलेला प्रहार आहे, असा संदेश देत मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले की, ही सत्ता केवळ खुर्चीसाठी नसून तळागाळातील जनतेच्या हितासाठी वापरली जाणार आहे. भाजप कार्यकर्त्यांसाठी हा दिवस ऐतिहासिक ठरला.
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर जिल्हा परिषदेत भगवा फडकवण्यात यश आले. विरोधकांच्या एकजुटीचा गाजावाजा करत सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न अखेर धुळीस मिळाला. परभणीच्या राजकारणात पुन्हा एकदा 'गेमचेंजर' म्हणून बोर्डीकर यांनी आपली छाप उमटवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.