Shivsena UBT-BJP News : जगातला सगळ्यात मोठा पक्ष, पण त्यांना जिल्हा परिषदेसाठी उमेदवार भेटत नाही. अपक्ष आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडे जाऊन पालकमंत्री आपल्या पक्षाचे बी फाॅर्म त्यांना देतात, ही लाजीरवाणी गोष्ट आहे, असा टोला खासदार संजय जाधव यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना लगावला होता. या टीकेला मेघना बोर्डीकर यांनी प्रत्युत्तर देत जाधव यांना सुनावले आहे. रत्नाकर गुट्टे हे आमचे सहयोगी आमदार आहेत, त्यामुळे मी त्यांना भेटले. पक्षासाठी काय योग्य आहे हे आम्ही ठरवण्यास समर्थ आहोत, खासदार जाधव यांनी यात लक्ष घालू नये, अशा शब्दात बोर्डीकर यांनी जाधव यांना सुनावले.
परभणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यात राजकीय कलगितुरा सुरू झाला आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आघाडीने बहुमतासह सत्ता काबीज केली. भाजपचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला. महापालिकेची सत्ता हाती आल्यानंतर खासदार संजय जाधव यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
जगात नंबर एकचा पक्ष, राज्यात, केंद्रात सत्ता पण त्यांना उमेदवार मिळत नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना आपल्या पक्षाचे एबी फाॅर्म एका अपक्ष आमदाराच्या घरी नेऊन द्यावे लागतात. त्यांचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर उभे करावे लागतात या पेक्षा दुसरी लाजीरवाणी गोष्ट कोणती? मग कसला तुमचा पक्ष नंबर वन? अशा शब्दात खासदार जाधव यांनी मेघना बोर्डीकर यांच्यावर हल्ला चढवला होता. महापालिका निवडणुकीत यश मिळाल्यानंतर शिवसेना-काँग्रेस आघाडीने जिल्हा परिषदेवर लक्ष केंद्रीत केले आहे. झेडपीच्या प्रचार सभेतून संजय जाधव हे मेघना बोर्डीकर आणि भाजपवर तुटून पडले आहेत.
आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमात बोर्डीकर यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय जाधव यांनी आमच्या पक्षात लक्ष घालू नये, आमच्या पक्षासाठी जे योग्य आहे, ते मी करत आहे. रत्नाकर गुट्टे हे आमचे सहयोगी आमदार आहेत. भाजपच्या 137 आमदारांमध्ये आम्ही त्यांना मोजतो. वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेवरूनच मी आमदार गुट्टे यांच्या घरी गेले होते. खासदार संजय जाधव यांनी महापालिका निवडणुकीतील विजयाच्या उन्मादात आमच्यावर टीका करू नये. त्यांना आमच्या पक्षांच्या अंतर्गत बाबीत लक्ष देण्याची मुळी गरज नाही, असे बोर्डीकर म्हणाल्या.
परभणी महापालिकेत लोकांनी दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे. आमच्या पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही हे जरी खरे असले तरी आम्ही पुढील काळात नव्याने प्रयत्न करू. महापौर पदासाठी भाजपच्या आॅपरेशन लोटसची चर्चा सुरू आहे, याकडे पालकमंत्री बोर्डीकर यांचे लक्ष वेधण्यात आले. यावर महापालिकेचा विषय आमच्यासाठी संपला आहे. जिल्हा परिषदेच्या तयारीत आम्ही सगळे व्यस्त आहोत, त्यामुळे आॅपरेशन लोटसच्या चर्चेला काही अर्थ नाही. महापालिकेचा विषय आमच्यासाठी संपला आहे, असे मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.