Imtiaz Jaleel Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil : इम्तियाज जलील यांची सावरकरांवरील टीका कुणाच्या फायद्यासाठी?

Prasad Shivaji Joshi

Parbhani Political News :

एमआयएम हा मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणारा राजकीय पक्ष असल्यामुळे मुस्लिम समाजाची बाजू घेणे हा त्यांचा नेहमीचा अजेंडा आहे. त्यामुळे पक्षाचे नेते खासदार असदुद्दिन ओवैसी त्यांचे बंधू अकबरुद्दिन ओवैसी आणि त्यांचे सर्व नेते नेहमीच अतिशय कडव्या भाषेत प्रचार करतात. त्याचाच भाग म्हणून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्रातील एकमेव खासदार इम्तियाज जलील यांनी परभणी जिल्ह्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली होती.

इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या या टीकेचा MIM ला किती फायदा होईल, हे अजून स्पष्ट नाही, पण भाजपला मात्र नक्कीच फायदा होईल, असे बोलले जाते. खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्या भाषणात 22 जानेवारी रोजी अयोध्येत झालेल्या प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा संदर्भ देत देशातील संविधान बदलण्याचा डाव असल्याची टीका केली. तसेच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Savarkar) उल्लेख भगौडा असा केला होता.

सावरकरांवरील टीकेनंतर भाजपचे (BJP) प्रदेश प्रवक्ते डॉ. उमेश देशमुख यांनी त्यास लगेचच प्रत्युत्तर दिले होते. 22 जानेवारीचा सोहळा इम्तियाज जलील यांच्या डोळ्यात खुपतोय, अशी टीका करीत सावरकरांना आदर्श मानण्यासाठी रक्तात देशप्रेम असावे लागते आणि ती योग्यता जलील यांची नाही, असा पलटवार देशमुख यांनी केला होता.

परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदूत्वाच्या विचारांनी येथील जनता प्रभावित झालेली आहे. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी सावरकरांवर केलेल्या टीकेमुळे सावरकरप्रेमी मतदारांमध्ये MIM विषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. MIM च्या कडव्या विचारांचा फायदा भारतीय जनता पक्षाला होत असल्यामुळे विरोधक MIM चा उल्लेख भाजपची बी टीम असाही करतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुळात इम्तियाज जलील यांनी सावरकरांविरुद्ध केलेले विधान हे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर का केले? काँग्रेसच्या विचारांशी मिळतीजुळती भूमिका का घेतली? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात MIM किती जागा लढवणार? स्वबळावर लढणार की मग कुणाशी युती करणार? याबद्दल अद्याप कुठलीच स्पष्टता नाही.

मग सावरकरांबद्दलचा वाद उकरून काढून इम्तियाज जलील यांना नेमके काय साध्य करायचे होते? आपल्या विधानाने भाजपला राजकीय फायदा होऊ शकतो, हे इम्तियाज यांना माहीत असून त्यांनी परभणीसारख्या संवेदनशील मतदारसंघात ते करण्याचे नेमके कारण काय? असा प्रश्न MIM ला भाजपची बी टीम म्हणणाऱ्यांनी केला आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT