Nanded Politics : अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना नांदेडमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद मोठी होती. महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा अशा सगळ्याच ठिकाणी महापौर, नगरसेवक, सदस्य आमदार असल्याने पक्षाला मोठा जनाधार होता. पक्ष फुटीनंतर मात्र हे चित्र बदलले. पक्षांतर्गत गटबाजीचा फटका शिवसेनेला महापालिका निवडणुकीत बसला.
नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपल्या पक्षातील महिला पदाधिकारी असलेल्या मीनल पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला. पाटील यांना बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. जिल्ह्यातील तीनही आमदारांचा पाठिंबा मिळवत त्यांनी विजय देखील मिळवला. आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नाकारवर टिच्चून निवडून आल्यानंतर आता थेट २०२९ मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना टक्कर देण्याची तयारी मीनल पाटील यांनी चालवली आहे.
राखी पौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी नांदेड उत्तर मतदारसंघात कार्यक्रम घेत काही पत्रकं वाटली. यावर मीनल पाटील यांनी बालाजी कल्याणकर वगळता इतर तीन आमदारांचे फोटो छापले. यातून महापालिका निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मीनल पाटील यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांच्याशी जुळवून घेतले होते. मात्र या ना त्या निमित्ताने मीनल पाटील या कल्याणकर यांना आव्हान देताना दिसत आहेत.
आज घडीला शिवसेनेचे जिल्ह्यात हेमंत पाटील, बाबुराव कदम, आनंद बोंढारकर, बालाजी कल्याणकर हे चार आमदार आहेत. तर महापालिकेत बोटावर मोजण्या इतके नगरसेवक आहेत. राज्याच्या सत्तेतला शिवसेना हा दुसरा प्रमुख पक्ष असला तरी नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात महायुतीत भाजपाच मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांमध्ये अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला दूर ठेवत एकहाती वर्चस्व निर्माण केले.
महापालिका निवडणुक युती न करता भाजपाने स्वबळावर लढवली, शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीचा पुरेपूर फायदा उचलत अशोक चव्हाण यांनी बालाजी कल्याणकर यांना आपल्या बाजूने वळवून घेतले. अशोक चव्हाण यांच्याशी जुळवून घेणे बालाजी कल्याणकर यांना आता जड जाऊ लागले आहे.
तीन आमदार एका बाजूला तर बालाजी कल्याणकर एकटे असे काहीसे चित्र शिवसेनेत निर्माण झाले आहे. याचा फटका मात्र संघटनेवर होताना दिसतो आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर कधी आणि कसा मार्ग काढतात? यावर आगामी जिल्हा परिषदेत पक्षाची परिस्थिती कशी असेल? हे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.