Minister Abdul Sattar Sarkarnama
मराठवाडा

Minister Abdul Sattar : मुख्यमंत्र्यांसमोर पन्नास हजार लाडक्या बहिणींची गर्दी ; अब्दुल सत्तार करणार शक्तीप्रदर्शन..

Abdul Sattar Politics News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोपर्यंत आपल्यावर विश्वास कायम आहे, तोपर्यंत आपण त्यांच्यासोबत कायम आहोत. ज्या दिवशी त्यांच्या माझ्यावर असलेला विश्वास संपेल तेव्हा मी घ्यायचा तो निर्णय घेईल, अशी भूमिका सत्तार यांनी मांडली आहे.

Jagdish Pansare

Sillod Assembly Constituency : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी `लाडकी बहिण योजना` आणली आहे. ही योजना लोकसभा निवडणुकीत फटका बसलेल्या महायुतीला तारणार असे बोलले जात आहे. सत्ताधारी मंत्री, आमदारांनी मोठ्या प्रमाणात या योजनेसाठी महिलांची नोंदणी सुरू केली आहे. तर विरोधक योजनेवर टीका करत पंधराशे रुपयात घर चालते का म्हणत? सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

या राजकीय कुरघोडीत राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मात्र आपल्या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात लाडकी बहिण योजनेचे रेकाॅर्डब्रेक अर्ज भरून घेण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितील पन्नास हजाराहून अधिक लाडक्या बहिणांना जमा करत मेळाव्याची जय्यत तयारी सुरू केली आहे.

येत्या 30 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथे होणाऱ्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांना सिल्लोडमध्ये आणून लाडकी बहिण योजनेच्या मेळाव्या निमित्ताने सत्तार जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी, बैठकांचा धडाक सत्तार यांनी मतदारसंघात लावला आहे.

विधानसभा निवडणुकीपुर्वी मुख्यमंत्र्यांच्यासमोर मतदारसंघात जोरदार शक्ती दाखवून अब्दुल सत्तार मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. गेल्या काही दिवसांपासून सत्तार हे आपला शिवसेनेसोबत प्रासंगिक करार असल्याचे विधान सातत्याने करत आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती असताना त्यांनी जालना मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांचे काम केले होते. सत्तार यांनी स्वतःच हे जाहीरपणे कबुल केले होते. (Congress) काँग्रेसशी त्यांची वाढती जवळीक पाहता विधानसभेपुर्वी सत्तार पुन्हा वेगळा निर्णय घेतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोपर्यंत आपल्यावर विश्वास कायम आहे, तोपर्यंत आपण त्यांच्यासोबत कायम आहोत. ज्या दिवशी त्यांच्या माझ्यावर असलेला विश्वास संपेल तेव्हा मी घ्यायचा तो निर्णय घेईल, अशी भूमिका सत्तार यांनी मांडली आहे.

परंतु गेल्या काही दिवसांपासून अब्दुल सत्तार यांनी प्रासंगिक कराराचा उल्लेख करणे टाळत महायुतीसोबतच आपण राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमोर निवडणुकीआधी जोरदार शक्तीप्रदर्शन करत सत्तार शिवसेनेतील आपले स्थान अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT