Chhatrapati Sambhaji Nagar : अब्दुल सत्तार हे असे राजकारणी आहेत, जे कधी वादग्रस्त, तर कधी आपल्या पडद्यामागच्या अनेक गोष्टींचा जाहीरपणे उलगडा करत अनेकांची दांडी गुल करतात. गेल्या 25-30 वर्षाच्या राजकारणात सत्तारांची चर्चा झाली ती वादग्रस्त विधाने आणि भष्ट्राचाराचे आरोप अन् घोटाळ्यांमुळे. सत्तार यांची चर्चा आणखी एका कारणामुळे राज्याच्या राजकारणात केली जाते, ती म्हणजे ते कायम सत्ताधारी पक्षांच्यासोबत असतात. (Abdul Sattar )
काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, कधी भाजपशी जवळीक तर आता बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या शिवसेनेतील एक महत्वाचे नेते म्हणून सत्तारांचा मान आहे. माझ्या नावातच सत्तार असल्यामुळे जिथे सत्ता तिथे मी, हे सांगायला सत्तार कचरत नाहीत. छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी त्यांच्या उपस्थितीत हज हाऊसचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना आंमत्रित करण्यात आले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वक्फ, अल्पसंख्याक खात्याचे मंत्री असल्यामुळे सहाजिकच सत्तार आपल्या घरचे कार्य असल्यासारखे या कार्यक्रमात वावरले. मोठ्या संख्येने उपस्थितीत लोकांसमोर भाषण आणि त्यातून विरोधक आणि स्वकीयांनाही टोलेबाजीतून आपले महत्व अधोरेखित करुन देण्यात सत्तारांचा हातखंडा आहे. पण या ओघात सत्तार यांच्या पोटातल्या अनेक गोष्टी काल ओठांवर आल्या.
मला हाजीहाजी करणे जमत नाही, मी कुठल्याही पक्षात असलो तर मला फरक पडत नाही. खासदारकीची उमेदवारी मिळावी म्हणून अशोक चव्हाणांकडे गेलो, पण त्यांनी नकार दिला त्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे गेलो नाही. उलट काँग्रेसमध्ये असताना इम्तियाज जलील यांना खासदार करण्यासाठी काम केले, अशी स्पष्ट कबुली सत्तार यांनी जाहीरपणे दिली. पक्ष, निष्ठा यापेक्षा हम करे सो कायदा, मनासारखे झाले नाही तर तुम्ही गेला.., असंच सत्तार यांना यातून सुचवायचे होते.
विशेष म्हणजे लोकसभा निवडणुका तोंडावर असतांना सत्तार यांनी जाहीरपणे दिलेली ही कबुली होती की मग सध्याच्या महायुतीतील नेत्यांना इशारा ? हे लवकरच स्पष्ट होईल. सलाम, दुआ, रामराम, जयभीम अशी आपल्या भाषणाची सुरूवात करणाऱ्या सत्तार यांनी आपण मंदिराचे पुजारी नाही, की मशीदीचा इमाम, पण मी पक्का राजकारणी आहे, असे सांगत सगळं काही राजकारणासाठीच हे त्यांनी दाखवून दिले.
ज्या शहरात हातगाडी ओढली, त्याच ठिकाणी आता हेलिकाॅप्टरमधून उतरतो अन् आयएएस, आयपीएस अधिकारी मला सॅल्यूट मारतात, असे म्हणत त्यांनी आपली राजकारणातील यशोगाथा ही उपस्थितांसमोर मांडली. लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्तारांनी केलेल्या या भाषणाचे अनेक अर्थ आहेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात सत्तार यांची भूमिका निर्णयक ठरू शकते. त्यामुळे उमेदवार देतांना आपल्याला विचारणा व्हावी, असेच त्यांना कदाचित कालच्या भाषणातून सूचवायचे होते.
तसेच मला विचारले नाही तर जसं मी अशोक चव्हाणांना सोडले तसे तुम्हालाही सोडू शकतो, असा सूचक इशाराही सत्तार यांनी देऊन टाकला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी आणि आता तीन पक्षांच्या महायुतीमध्ये मंत्री राहिलेल्या सत्तारांचा हा काॅन्फिडन्स उगाच नाही, हे आतापर्यंत त्यांनी केलेल्या राजकीय खेळी आणि विरोधकांना दिलेली मात यावरुन स्पष्ट होते. सत्तार यांच्या पोटातलं ओठावर आल्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी मात्र धसका घेतला असणार आहे.
(Edited By-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.