MLA Abhimanyu Pawar : Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

MLA Abhimanyu Pawar News : लातूरच्या रेल्वे फॅक्टरीत कोच कधी तयार होणार? दानवे म्हणाले...

Chetan Zadpe

Latur News : लातूरच्या जिल्ह्याच्या राजकारणात झिरो टू हिरो ठरलेल्या भाजपच्या वाटचालीत मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीच्या स्थापनेचा मोठा वाटा आहे. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारने लातूरमध्ये रेल्वे कोचनिर्मितीचा कारखाना सुरू करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारच्या मंजुरीने घेतला होता. या मुद्द्यावर भाजपने गेल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 2 लाख 89 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या रेल्वे कोच फॅक्टरीमधून हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार, लातूरसह मराठवाड्यात या कोच फॅक्टरीशी संबंधित छोटे-मोठे उद्योग उभारले जाणार, अशा घोषणा कोच पॅक्टरीच्या भूमिपूजनापासून ते ती पूर्ण होईपर्यंत भाजपच्या स्थानिक व राज्य पातळीच्या नेत्यांनी केल्या होत्या. रेल्वे कोच फॅक्टरी तयार असली तरी अद्याप या कारखान्यातून एकही कोच तयार झालेला नाही. त्यामुळे रोजगार उपलब्धी, छोटे-मोठे उद्योग येण्याचे आश्वासनही हवेतच विरले.

विरोधक आणि लातूरची सर्वसामान्य जनताही आता याबाबत भाजपला प्रश्न विचारू लागली आहे. आगामी लोकसभा व त्यानंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आता हा मुद्दा पुन्हा हाती घेतला आहे. औशाचे भाजपचे आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे अभिमन्यू पवार यांनी या संदर्भात नुकतीच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन लवकरात लवकर लातूरच्या रेल्वे कोच फॅक्टरीत कोच तयार करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी केली.

त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार रेल्वे विकास निगम लिमिटेड या कंपनीने मेट्रोवाॅगन मॉश आणि लोकोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक सिस्टिम या रशियन कंपन्यांसोबत मिळून कायनेट रेल्वे सोल्युशन्स लिमिटेड नामक जॉइंट व्हेंचरची स्थापना केली आहे. कायनेट या जेव्हीमध्ये आरव्हीएनएलची भागीदारी 25%, मेट्रोवाॅगन माॅशची भागीदारी 70% आणि लोकोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक सिस्टिमची भागीदारी 5% असणार आहे.

जॉइंट व्हेंचरच्या सर्व प्लांट्समध्ये मिळून एकूण 58000 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. याच जॉइंट व्हेंचरच्या माध्यमातून लातूरच्या रेल्वे कोच फॅक्टरीमधून 120 स्लीपर वंदे भारत ट्रेन्सची (सद्यःस्थितीत वंदे भारतमध्ये फक्त सीटिंग कोचेस आहेत) निर्मिती केली जाणार असून, फॅक्टरी लवकरात लवकर कार्यान्वित केली जाईल, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी आमदार पवार यांना दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT