Akola News : राज्यात, केंद्रात भाजपची सत्ता तरी मॉडेल रेल्वे स्टेशन होईना!!

BJP : नेत्यांची मोठाली आश्वासने विरली हवेतच; पाठीमागून अमरावतीने बाजी मारली
Akola Railway Station.
Akola Railway Station.Sarkarnama
Published on
Updated on

Model Railway Station : अकोला मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून आता केवळ नावालाच उरले आहे. महाराष्ट्रासह केंद्रात बुहमत असलेले भाजपचे सरकार असताना सुद्धा अकोला मॉडेल रेल्वे स्थानकाचे स्वप्न अपूर्णच आहे. अशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमची पोहोच आहे असा डंका पिटणारे सत्ताधारी नेतेही मॉडेलचे काम पूर्णत्वास नेऊ शकलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

अकोला मॉडेल रेल्वे स्थानकाच्या प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विदर्भातील अकोला हे अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. ब्रॉडगेज आणि पूर्वीच्या मीटरगेज लोहमार्गावरील अकोला मध्यवर्ती केंद्र आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने अकोल्यात मॉडेल रेल्वे स्थानकाची घोषणा काही वर्षांपूर्वी केली होती. मात्र ही घोषणा हवेतच विसली आहे.

Akola Railway Station.
Akola Shiv Sena : रस्त्याच्या मागणीसाठी बांधकाम कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

मॉडेल रेल्वे स्थानकाची घोषणा झाल्यानंतर परिसरात कामालाही सुरुवात झाली होती. मात्र अद्यापही मॉडेल स्थानक नावालाच आहे. पाठीमागून येत अमरावतीचे रेल्वे स्थानक भव्यदिव्य झाले. तत्कालीन राष्ट्रपदी प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यकाळात या रेल्वे स्थानकाचा कायापालट झाला. अमरावती शहर तसे पाहिल्यास रेल्वेच्या मुख्य मार्गावर नाही. मध्य रेल्वेचे ‘साइड स्टेशन’ म्हणून अमरावतीकडे पाहिले जाते. त्या तुलनेत बडनेरा रेल्वे स्थानक मुख्य मार्गावर आहे. असे असले तरी अमरावतीचे लोकप्रतिनिधी ‘मॉडेल’बाबत यशस्वी झाले आहेत.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर असलेले अकोला रेल्वे स्थानक मात्र उपेक्षित राहिले आहे. अकोल्यातील अनेक नेत्यांनी निवडणुकीमध्ये अनेकदा बाजी मारली आहे. मात्र या सर्वच लोकप्रतिनिधींनी अकोल्याच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने काय केले, हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. अकोल्यातील उड्डाणपूल, अंडरपास, रेल्वे ब्रीज, महामार्गाचे काम ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देण आहे. मग अकोल्यातील लोकप्रतिनिधी करतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अकोला रेल्वे स्थानकाचा भारतात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या पहिल्या शंभर स्थानकांमध्ये समावेश आहे. हावडा-नागपूर-मुंबई मार्गावर धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या अकोला स्थानकावर थांबतात. दररोज अकोला स्थानकावरून सुमारे 10 ते 15 हजार प्रवासी येणे-जाणे करतात. त्यामुळे हे स्थानक आदर्श असावे, अशी कल्पना होती. अशात काही वर्षांपूर्वी अकोला रेल्वे स्थानकाला मॉडेल रेल्वे स्थानकाचा दर्जा देऊन कामही सुरू करण्यात आले होते. मात्र मध्येच माशी शिंकली. एकाही लोकप्रतिनिधीने हे काम पूर्ण व्हावे यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह केला नाही.

देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती अमरावतीच्या प्रतिभाताई पाटील असताना त्यांनी सरकारच्या माध्यमातून अमरावती शहराचा कायापालट करून घेतला. अमरावतीचे रेल्वे स्टेशन अकोलानंतर मंजूर झाले आहे, असे सांगण्यात येते. मात्र अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशन मंजुरही झाले आणि त्याचे कामही पूर्ण झाले. आता ही भव्यदिव्य इमारत पाडून येथे व्यावसायिक संकुल उभारण्याचा घाट अमरावतीमधील दोन राजकीय नेत्यांनी लावला आहे.

Akola Railway Station.
Akola Police : 700 शूटर्स असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या तस्करांना अकोल्यात अटक

अमरावती येथे रेल्वेचे विभागीय कार्यालय स्थापन होण्याची मागणी आहे. असे झाल्यास नागपूर, भुसावळ आणि नांदेड डिव्हिजनचे विभाजन होऊन या भागातील प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. मात्र त्याकडे लक्ष देण्याऐवजी अमरावतीमधील ‘त्या’ दोन नेत्यांनी व्यावसायिक संकुलाच्या उभारणीतून आपला किती फायदा होतो, यावर अधिक जोर देण्यास सुरुवात केली आहे. अशात अकोल्यात भव्यदिव्य मॉडेल रेल्वे स्टेशन झाल्यास जे डिव्हिजन अमरावतीला मिळविता आले नाही, ते अकोल्याला मिळविता येऊ शकते. परंतु अकोल्यातील सुस्त लोकप्रतिनधींना ही बाब कळेनाशी झाली आहे.

अकोला रेल्वे स्थानक येथे प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर प्रवाशांच्या सुविधेसाठी सरकत्या जीन्याचे लोकार्पण गेल्यावर्षी करण्यात आले. मात्र हा जिनाही नियमितपणे सुरू नसतो. अधिकतर वेळ हा जीना बंदच असतो. त्यामुळे वृद्ध व दिव्यांग प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Akola Railway Station.
गृहिणींचा तो बॅनर भाजप नगरसेवकाने फाडला ; बघा अकोल्यात काय घडलं ? | Akola Constituency | BJP |

अक्षम्य राजकीय दुर्लक्ष

अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दशकांपासून भाजपचा खासदार आहे. मोदी सरकारमध्ये खासदार संजय धोत्रे हे केंद्रीय मंत्रीही होते. मात्र जिल्ह्यात कोणताही नवा प्रकल्प ते आणू शकले नाही, असा आरोप विरोधकांकडून त्यांच्यावर होतो. केंद्रात भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्रातही भाजपच सत्तेची चावी आपल्या खिशात ठेऊन आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेक दिवस अकोल्याचे पालकमंत्री होते. परंतु त्यानंतरही अकोल्याचे काय मिळविले, तर भोपळा असा आरोप आता होत आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या स्थापनेनंतर भाजपला आगामी निवडणुकीत श्रीराम पावणार आहेत. मोदींचाही जलवा कायम आहे. परंतु त्याच श्रीरामाची व मोदींच्या करिश्म्याची जादू अकोल्यात केव्हा दिसणार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

Akola Railway Station.
Akola BJP Politics : ‘गाव चलो अभियान’ राबवित काय साध्य होणार?

उत्तर, दक्षिणेची ‘कनेक्टिव्हिटी’

उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा रेल्वेचा प्रमुख टप्पा अकोला-पूर्णा रेल्वे मार्गही अद्याप दुर्लक्षित आहे. या मार्गाच्या ब्रॉडगेजचे काम पूर्ण होऊन 15 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. मात्र या काळात मार्गावरून केवळ 23 गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दैनंदिन धावणाऱ्या केवळ चारच गाड्यांचा समावेश आहे. या मार्गावरील मागण्या व समस्या अद्यापही कायम आहेत.

केव्हा मिळणार सुविधा?

मध्य रेल्वेच्या मॉडेल रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांसाठी हॉटेल्स, सुसज्ज प्रवासी बैठक व्यवस्था, अत्याधुनिक तंत्रज्ञान, लायटिंग, वायफाय, सुविधायुक्त पूल, लिफ्ट आदींचा समावेश होणार होता. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तंत्रज्ञान, सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले. अकोला रेल्वे स्थानक पीपीपी मॉडेलवर जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन म्हणून तयार होणार होते. रेल्वे स्टेशनला एअरपोर्ट डिझाइन देण्याची मूळ संकल्पना आहे. मात्र अकोल्याचे रेल्वे स्थानक बस स्थानकापेक्षाही कमी दर्जाचे झाले आहे. पाठीमागून आलेले अमरावती, खंडवा, नाशिक, भुसावळ येथे मॉडेल स्टेशन तयारही झाले आहेत.

Edited By : Prasannaa Jakate

Akola Railway Station.
Akola West Constituency By Election : अकोला पश्चिममध्ये पोटनिवडणूक झाल्यास 'हे' असतील वंचितचे उमेदवार !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com